अमरावती : अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यात राजकीय द्वंद्व सुरू असतानाच आता बहिरम येथील यात्रेत दोन्ही नेत्यांनी आयोजित केलेल्या शंकरपटाच्या (बैलगाडा शर्यत) निमित्ताने पुन्हा राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे. बहिरम यात्रेच्या इतिहासात प्रथमच दोन शंकरपटांचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार प्रवीण तायडे यांच्या वतीने येत्या ८ ते १० जानेवारीदरम्यान बहिरम येथे शंकरपट आयोजित करण्यात आला आहे, तर माजी आमदार बच्चू कडू यांच्या वतीने आयोजित शंकरपट २१ ते २३ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. यावर्षी यात्रेकरूंना दोन वेगवेगळ्या शंकरपटांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

बहिरम यात्रेला शंकरपटाचा इतिहास आहे. मध्यंतरीच्या काळात ही परंपरा खंडित झाली होती. पण, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी अलीकडच्या काळात शंकरपट सुरू केला. बच्चू कडू यांनी यंदा आयोजित केलेल्या शंकरपटात दहा लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे.आमदार प्रवीण तायडे यांच्या वतीने आयोजित शंकरपटात ११ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. यंदा बहिरम यात्रेत प्रवीण तायडे यांचा फलक अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकल्यानंतर निर्माण झालेल्या वादात प्रहार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. त्यातच प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करीत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण तायडे यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यातच आता दोन्ही नेत्यांकडून शंकरपटांचे आयोजन करण्यात आले आहे. बहिरमची यात्रा दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने गाजत असते. राजकीय पुढाऱ्यांचे फलक हे चर्चेचे विषय ठरत असतात.

हेही वाचा…खेडेगावातून थेट जागतिक भरारी, महिला काँस्टेबलची वृत्ती करारी.

संपूर्ण राज्‍यात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्‍हणून ओळख असलेल्‍या बहिरमच्‍या यात्रेला गेल्या महिन्यात उत्‍साहात प्रारंभ झाला. बहिरमबाबांच्या दर्शनाला दरवर्षी हजारो भाविक येतात. विदर्भातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही यात्रा प्रसिद्ध असल्याने भाविक सलग दीड महिना देवदर्शन व यात्रेचा लाभ घेतात.

हेही वाचा…हत्याकांडांच्या घटनेत गृहमंत्र्यांचे राज्यात शहर तिसऱ्या स्थानावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात्रेत हंडीतील मटण आणि रोडगे प्रसिद्ध आहेत. खवय्यांसाठी ही यात्रा एक मेजवानी ठरते. हंडीतील मटण किंवा वांग्याची भाजी आणि रोडग्याचा आस्वाद घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक या ठिकाणी येतात. मांसाहारी खानावळी यात्रेत असतात. चुलीवरची गरमागरम भाकर हे आकर्षण असते. काही खवय्ये मित्रपरिवारासह राहुटीमध्ये सहभोजनाचे आयोजन करतात. बहिरमच्या रोड्ग्याच्या जेवणासाठी लोक शनिवार-रविवारी दूर अंतर पार करून बहिरमला येतात.