अमरावती : शेतकरी कर्जमाफीविषयी जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी त्यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता हा वाद चांगलाच पेटला आहे. विखे पाटील यांच्या एका समर्थकाने थेट बच्चू कडू यांच्याशी संवाद साधून त्यांना आव्हान दिले आहे. बच्चू कडूंनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे वाहन फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, त्यावर प्रत्युत्तर म्हणून बच्चू कडूंच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या किंवा त्यांच्या तोडाला काळे फासणाऱ्याला तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या दोघांमधील संभाषण समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक प्रतीक कदम पाटील यांनी बच्चू कडू यांना फोन करून आव्हान दिले आहे. विखे पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी २ हजारावर शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण केले, असा दावा प्रतीक कदम पाटील यांनी संभाषणादरम्यान केला. त्यावर बच्चू कडू यांनीही आम्ही त्याहून जास्त कुटुंबांना आधार दिल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे विखे पाटील असे वक्तव्य कसे काय करू शकतात, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला. या संभाषणाचा पुष्टी अद्याप झालेली नाही.
आधी कर्जबाजारी व्हायचे आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना सुनावले होते. त्यावर बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. नाव कृष्णाचे आहे, मात्र कृत्य कंसाचे करायचे असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून लावले पाहिजे. मुख्यमंत्री एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तर दुसरीकडे वाचाळवीर मंत्री अशी विधाने करतात. लोक त्यांना झोडपत नाहीत, याचे आभार मानले पाहिजे. ही नालायकी आता थांबवा, असेही बच्चू कडू म्हणाले होते.
यावेळी त्यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. तसेच मला जर त्यांची गाडी दिसली, तर मीच फोडणार, असेही ते म्हणाले होते.
आता बच्चू कडू यांच्या विधानावर विखे पाटील यांच्या समर्थकांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विखे पाटील समर्थक आणि बच्चू कडू यांच्यातील संभाषणातून ते प्रतिबिंबीत झाले आहे. हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
