​अमरावती : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना आधुनिक बनवण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ‘आली अलेक्सा शाळेला’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ’अलेक्सा डॉल्स’ पुरवण्यात आल्या आहेत. यामुळे मुलांना अलेक्सासोबत संवाद साधण्याची आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळणार आहे.

​नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून या उपक्रमाची सुरुवात झाली. आता हा प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात राबवला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या पुढाकाराने आणि आयसीआयसीआय बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) शिक्षण विभागाला हे ’अलेक्सा युनिट्स’ पुरवले जात आहेत.

​हे युनिट्स विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती मिळवण्यास, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे करण्यास मदत करतील. यामुळे मुलांचे ज्ञान वाढण्यास मदत होईल. निपुण भारत अभियानात जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चांदसुरा, फॉरेस्ट मालूर, दहेन्द्री, वाठोडा बुद्रुक आणि पिंपळखुटा मोठा या पाच शाळांना शिक्षक दिनानिमित्त विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अलेक्सा डॉल आणि व्ही.आर. युनिट्सचे वाटप करण्यात आले.

​या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षण साधनांचा लाभ मिळत असून, त्यांच्या ज्ञानार्जनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. अलेक्साचा जिल्हा परिषद शाळांमध्ये वापर हा एक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी शैक्षणिक उपक्रम आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित व्हॉइस असिस्टंट प्रणाली शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत करते, ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक सोपी, मनोरंजक आणि परस्परसंवादी होते.

अलेक्सा विविध भाषांमध्ये संवाद साधू शकते. यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा इतर भाषा शिकण्यास आणि उच्चार सुधारण्यास मदत होते. विद्यार्थी अलेक्साला एखादा शब्द किंवा वाक्य उच्चारण्यास सांगू शकतात. तसेच, अलेक्सा मुलांना विविध कथा आणि कविता ऐकवू शकते, ज्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. ​अलेक्सा वापरून विविध विषयांवर मजेदार क्विझ तयार करता येतात. यामुळे विद्यार्थी खेळत-खेळत अभ्यास करतात आणि त्यांचे ज्ञान तपासू शकतात.

​विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जवळ आणण्यासाठी, त्यांच्या इंग्रजी संवादात सुधारणा करण्यासाठी, कुतूहल वाढवण्यासाठी आणि तंत्रज्ञानाची भीती दूर करण्यासाठी हा आमचा एक उपक्रम आहे. हे पूर्णपणे आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून केले जाते. ’ निपुण’ कामगिरी आणि शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या गुणवत्तेनुसार आता फक्त ५० शाळा निवडल्या जातील. – संजिता महापात्र, सीइओ, जिल्हा परिषद, अमरावती.