नागपूर : रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी गुजरातमधील जामनगर येथे वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या ‘वनतारा’ बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘सूर्यतारा’ निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागाही शोधण्यात आली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी ‘सूर्यतारा’च्या निर्मितीसाठी थेट अनंत अंबानी यांना पायघड्या घातल्या आहेत.

नागपूर येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत गणेश नाईक यांनी ‘सूर्यतारा’ योजनेविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, वन खात्याचे सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अलीकडेच आम्ही ‘वनतारा’ला भेट दिली. तिथल्या सोयीसुविधा अत्याधुनिक आहेत. तिथे प्रत्येक प्राण्याची काळजी योग्य पद्धतीने घेतली जात आहे. महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे.

अधिवास कमी पडत असल्यामुळे प्राणी बाहेर पडून मानव-वन्यजीव संघर्ष घडत आहे. पिंजऱ्यात प्राणी अडकवून ठेवणे हा आमचा उद्देश नाही. अशा वेळी ‘वनतारा’मध्ये ज्या पद्धतीने प्राण्यांना सुविधा मिळत आहेत, अशाच सुविधा आपल्याला महाराष्ट्रातही जेरबंद प्राण्यांना देता याव्यात, यासाठी ‘सूर्यतारा’ प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठाण्यात महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जागा शोधली आहे. हा प्रकल्पही अनंत अंबानी यांनीच उभारावा यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे.