नागपूर : अनेकांच्या मोबाईल फोनमधील “कॉल” आणि “डायल” चे सेटिंग गुरुवारी अचानक बदलले. त्यामुळे वापरकर्त्यांना नेमके काय झाले हे कळलेच नाही. फोन हॅक झाल्याची शंकाही आली. काहींना हा बदल आवडत आहे, तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी वापरकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटलेल्या दिसून आल्या. मात्र, हा बदल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या फोनमध्ये झाला.

कोणताही अपडेट किंवा पूर्वसूचना न देता झालेल्या या बदलामुळे अजूनही वापरकर्ते चिंतेत आहेत. सोशल मीडियावर देखील यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र बहुतेक लोकांना यामागचे कारण माहिती नाही. फोनमध्ये झालेल्या या बदलामुळे अनेक अँड्रॉइड वापरकर्ते चकित झाले आहेत. हा बदल फक्त त्याच स्मार्टफोन्समध्ये झाला आहे ज्यामध्ये गुगल फोन अँप डायलर अ‍ॅप म्हणून सेट आहे. गुगलने आपल्या फोन अ‍ॅपमध्ये मॅटेरियल थ्री एक्सप्रेसिव्ह रिडिझाईन लागू केले आहे, जे आता वापरकर्त्यांपर्यंत पोहोचायला लागले आहे. हे नवीन डिझाइन खास करून अधिक मॉडर्न, सिंपल आणि युजर-फ्रेंडली करण्यासाठी आणले गेले आहे. यात सर्वात मोठा बदल अ‍ॅपच्या नेव्हिगेशन स्टाइलमध्ये झाला आहे.

नवीन बदल काय

नवीन बदलानंतर अ‍ॅपमध्ये आता तीन टॅब आहेत. “फेवरेट” आणि “रिसेन्ट” यांना एकत्र करून “होम टॅब” तयार केला आहे. यात “कॉल हिस्ट्री” दिसते आणि वरच्या बाजूला “फेवरेट कॉन्टॅक्ट्स” दिसतात. त्यामुळे वारंवार “कॉन्टॅक्ट” शोधायची गरज नाही. “की पॅड” ला देखील नवीन डिझाइन मिळाले आहे. आता तो स्वतंत्र टॅब बनवला आहे. नंबर पॅड आता गोलाकार डिझाइनमध्ये दिसतो, ज्यामुळे इंटरफेस अधिक क्लीन दिसतो.

“कॉन्टॅक्ट” मध्ये “कॉन्टॅक्ट” शिवाय सेटिंग, क्लिअर कॉल हिस्ट्री आणि हेल्प व फीडबॅक हे ऑप्शन्स मिळतात. “इन कॉल” मध्येही मोठा बदल दिसून येतो. आता कॉलदरम्यानचे बटणं पिल-शेपमध्ये दिसतात आणि निवडल्यावर ते राउंडेड रेक्टॅंगलमध्ये बदलतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे “एन्ड कॉल” बटण आधीपेक्षा मोठे केले आहे, ज्यामुळे कॉल डिस्कनेक्ट करणे सोपे झाले. मात्र, त्याचवेळी हे बदल आवडत नसेल, तर ते हटवता देखील येणार आहेत. “वनप्लस” ने आपल्या वापरकर्त्यांना याबाबत पर्याय दिला आहे. यासाठी “कॉलिंग अ‍ॅप”वर काही वेळ “टॅप” करावे लागेल, त्यानंतर “ऍप इन्फो” चे “ऑप्शन” दिसेल. आता हे ओपन करून “अनइन्स्टॉल अपडेट” करता येईल. यानंतर हे नवीन फीचर हटेल.