शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल परब यांचे मत

शिवसेनेच्या सदस्यांचा जर सन्मान होत नसेल, तर नागपूर महापालिकेत सध्या शिवसेनेची जी स्थिती आहे तीच स्थिती मुंबई महापालिकेत भाजपची आहे, दोन्ही ठिकाणी एकाच वेळी महापालिका निवडणुका असल्यामुळे भाजपने त्याबाबतीत विचार करावा, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि नागपूर शहर संपर्कप्रमुख आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी दिला.

महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आलेली असताना भाजपचा गड असलेल्या शहरात स्वबळावर जम बसविण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कधीकाळी निष्ठावान शिवसैनिक असणाऱ्या, पण सध्या दुरावलेल्या शिवसैनिकांना स्वगृही आणले जाणार आहे. पक्षबांधणीसह या सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी नागपुरात आले असताना पत्रकारांशी चर्चा केली.

महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना संघटनात्मकदृष्टय़ा कामाला लागले आहेत. नागपुरात शिवसेनेचे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेत शिवसेनेच्या सदस्यांना सन्मान मिळत नाही. राज्यात सत्तेत असताना पदाधिकाऱ्यांना दुय्यम स्थान मिळत असेल, तर आज नागपूर महापालिकेत शिवसेनेची जी स्थिती आहे तीच मुंबई महापालिकेत भाजपची आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने युती होईल की नाही, हा निर्णय दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते घेतील. मात्र आज नागपुरातील प्रत्येक वार्डात शिवसेनेचे वर्चस्व वाढविण्यासाठी   काम सुरू असून प्रत्येक वार्ड शिवसेनेचा झाला पाहिजे, या दृष्टीने त्या त्या भागात निष्ठावान कार्यकर्ते तयार झाले आहेत. जनतेच्या समस्या सोडवणारा आणि त्यांना विश्वासात घेणारा शिवसैनिक वार्डात तयार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.