चंद्रपूर : भद्रावती नगरपरिषदेमार्फत होणाऱ्या बांधकामाची टक्केवारी (कमिशन) कुणाकुणाला किती प्रमाणात द्यावे लागते याचा विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांचा ‘व्हिडिओ’ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर संतप्त झालेल्या विद्यमान नगरसेवकाने माजी नगरसेवकाच्या घरावर जाऊन शाब्दिक हल्ला चढवला. तसेच तलवारीने मारण्याची धमकी दिली. यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांनी विद्यमान नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती विनोद वानखेडे यांना नगरपरिषदेमार्फत होणाऱ्या बांधकामाचे कंत्राट कोणकोणत्या नगरसेवकांना मिळते, तसेच या कामाचे ‘कमिशन’ कुणाकुणाला किती द्यावे लागते याची विचारणा केली. वानखेडे यांनी याबाबत कारेकरांना चालत असलेल्या व्यवहाराची इथंभूत माहिती दिली. यावेळी ही बाब कारेकर हे आपल्या भ्रमणध्वनीद्वारे चित्रित करीत असल्याची त्यांना कल्पना नव्हती. त्यात वानखेडे यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता, बिल विभागाचे कर्मचारी, तसेच इतर कंत्राटदाराच्या प्रमाणपत्रावर काम घेतल्यास द्यावयाच्या ‘कमिशन’ची माहिती दिली. तसेच, विद्यमान नगरसेवकांना हस्तक्षेप न करण्याकरिता नगराध्यक्षतर्फे दरमहा ६ हजार रुपये दिले जात असल्याचा गौप्यस्फोट वानखेडे यांनी केला.
हेही वाचा – वर्धेतील मराठी साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून अपेक्षित ५० लाख रुपयांच्या निधीचे काय?
हेही वाचा – अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईबाहेर जाऊ शकणार
हा ‘व्हिडीओ’ समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर त्याची चर्चा होऊ लागली. वानखेडे यांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलावून चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे, चिडून विनोद वानखडे यांनी प्रशांत कारेकर यांच्या घरी जात कारेकरांवर शाब्दिक हल्ला चढवून तलवारीने कापून काढण्याची भाषा वापरली. या प्रकरणाची तक्रार प्रशांत कारेकर यांनी पोलिसात दिली. दोघांनाही पोलिसांनी बोलावून गुन्हा नोंदवला. हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्याने आपण न्यायालयात दाद मागू शकता, असे ठाणेदार गोपाल भारती यांनी सांगितले. मात्र, या ‘व्हिडिओ’मुळे बांधकामाचे कमिशन कुणाला किती जाते याची माहिती नागरिकांना कळली. त्यामुळे, नगरपरिषद क्षेत्रातील कामाचा दर्जा निकृष्ट का आहे, हे आता भद्रावतीकरांना समजल्याची चर्चा होती.