लोकसत्ता टीम
अकोला : पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन अखेर शुक्रवारी खात्यात जमा झाले आहे. फेब्रुवारीचे जमा झाले असून मार्च महिन्याचे वेतन देखील येत्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे साडेपाच हजारावर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. या संदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये ९ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित होताच रखडलेले वेतन जमा करण्याच्या प्रक्रियेला गती आली.
अमरावती विभागात दीडशेच्यावर महाविद्यालयांमध्ये पाच हजारावर, तर अमरावती विद्यापीठात सुमारे ५०० कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा गेल्यानंतरही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन रखडले होते. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने हे वेतन थांबले होते. काही तांत्रिक समस्या देखील आली होती. राज्यात अमरावतीसह दोन विभागात ही अडचण होती. यासंदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली. अखेर शासनाने फेब्रुवारी व मार्च महिन्याची वेतन अनुदान पाठवले. त्यानंतर उच्च शिक्षण सहसंचालकांनी प्रक्रियेला गती देऊन फेब्रुवारी महिन्याचे वेतन जमा केले आहे. मार्च महिन्याचे वेतन देखील पुढील आठवड्यात जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आणखी वाचा-“…म्हणून आम्ही सगळ्यांनी शिंदेंसह उठाव केला”; उदय सामंत यांनी नागपुरात सांगितली…
शासनाकडून फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या वेतनाचे अनुदान प्राप्त झाले. कर्मचाऱ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे वेतन जमा करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. मार्च महिन्याचे वेतन देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात पुढील आठवड्यात जमा होईल. -डॉ. सुबोध भांडारकर, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, अमरावती.