अमरावती : शहरातील नामांकित उद्योजक आणि भू-विकासक नरेंद्र भारानी तसेच दुसरे भू-विकासक संजय हरवानी यांच्‍यातील वाद आता पोलीस ठाण्‍यात पोहोचला असून भारानी यांच्‍या तक्रारीच्‍या आधारे हरवानी यांच्‍या विरोधात नांदगावपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्‍हा दाखल केला आहे.

नरेंद्र गोपीचंद भारानी (४४, रा. नाशिककर प्‍लॉट, अमरावती) हे ड्रीम्‍ज इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर या पेढीचे भागीदार आहेत, तर फसवणुकीचा आरोप असलेले संजय हरवानी ( ५२, रा. अमरावती) हेदेखील या पेढीत २०२० पर्यंत भागीदार होते. सध्‍या ड्रीम्‍ज इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरचे काम नरेंद्र भारानी आणि त्‍यांचे बंधू पाहतात. या पेढीच्‍या भागीदारांच्‍या नावे नागपूर मार्गावर बोरगाव धर्माळे येथील मोठी शेतजमीन विकत घेण्‍यात आली आणि त्‍याचे भूखंड पाडण्‍यात आले होते. नरेंद्र भारानी यांनी त्‍यातील काही भूखंडांवर व्‍यापारी संकुल उभारले. यातील एका भुखंडाचे क्षेत्रफळ हे १ लाख १ हजार चौरस मीटर तर दुसऱ्या भुखंडाचे क्षेत्रफळ १७ हजार ८९९ चौरस मीटर आहे. ही संपूर्ण जागा आपल्‍या मालकीची असून आपल्‍या ताब्‍यात असल्‍याचा नरेंद्र भारानी यांचा दावा आहे.

हेही वाचा – अकोला बाजार समितीवरील राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम; सभापतीपदी शिरीष धोत्रे, ज्ञानेश्वर महल्ले उपसभापती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भूखंडाच्‍या पश्चिमेकडे ड्रीम्‍ज इन्‍फ्राव्हिजन या दुसऱ्या कंपनीतर्फे नरेंद्र भारानी आणि त्‍यावेळचे भागीदार संजय हरवानी यांनी रहाटगाव येथील शेतजमीन खरेदी केली होती. या जमिनीची संजय हरवानी यांनी विक्री केली, असे भारानी यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. या जागेला सार्वजनिक रस्‍ता नाही, याची माहिती संजय हरवानी यांना होती. ह‍रवानी यांनी आता त्‍यांच्‍या मालकीच्‍या रहाटगाव येथील जागेवर ले-आऊट पाडण्‍याची तयारी केली आहे. हरवानी यांनी त्‍यांच्‍या जागेतून रस्‍ता न ठेवता भारानी यांच्‍या मालकीच्‍या जागेतून सार्वजनिक रस्‍ता दाखवला. महापालिकेकडून तांत्रिक मंजुरीदेखील मिळवली. यामुळे आपले आर्थिक नुकसान आणि फसवणूक झाल्‍याचे भारानी यांचे म्‍हणणे आहे. पोलिसांनी हरवानी यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे.