अकोला : जिल्ह्यातील कुरणखेड येथील रहिवासी असलेल्या सैन्य दलातील जवानाला अयोध्या येथे वीरमरण आले. कर्तव्यावर असतानाच विजेचा जोरदार झटका बसल्याने जवान नितेश घाटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त जिल्ह्यात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे. अकोला जिल्ह्यातील विविध गावातून जवान सैन्य दलात कार्यरत आहेत. देशाच्या विविध भागात ते आपली सेवा देत असतात.

जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या कुरणखेड गावातून अनेक जवान सैन्य दलात भरती झाले. देशाच्या सीमेसह विविध भागात आपली सेवा देतात. कुरणखेड हे सैनिकांचे गाव म्हणून त्याची ख्याती झाली. कुरणखेड गावाची भूमी शहीद सैनिकांसोबतच आजी-माजी सैनिकांच्या नावाने प्रसिद्ध आहे. गावातून सैन्य दलात दाखल होण्याची परंपरा निरंतर चालत आली. दरम्यान, कुरणखेड येथील आणखी एका सैनिकाला कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.

कुरणखेड येथील नितेश घाटे यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. भारतीय सैन्य दलाच्या पुलगाव अंतर्गत येत असलेल्या अकोला जिल्ह्यातील कुरणखेड गावातील नितेश मधुकर घाटे हे गेल्या पंधरा वर्षापासून सैन्यात मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. घाटे यांची गेल्या काही दिवसापासून अयोध्या येथे सेवा सुरू होती. आपल्या कर्तव्यावर असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कुरणखेड गावात पोहोचताच शोककळा पसरली असून घाटे परिवाराला मोठा धक्काच बसला आहे.

नितेश घाटे यांच्या सैन्य दलातून सेवानिवृत्त बंधूचा देखील अपघाती मृत्यू

कुरणखेड येथील शेतकरी मधुकर घाटे हे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती करून संसार चालवत आहे. त्यांनी आपल्या तीन मुलांना शिकवले. एक मुलगा शेतकरी आहे, तर मोठा मुलगा संदीप घाटे हे सुद्धा भारतीय सैन्य दलात सेवा बजावत होते. सेवा संपल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या घटनेला काही वर्ष उलटल्यानंतर काल लहान मुलगा नितेश घाटे यांना सुद्धा आपल्या कर्तव्यावर असताना अयोध्या येथे विजेचा जोरदार धक्का बसून वीरमरण आले आहे. एकाच कुटुंबातील दोघे भाऊ, सैन्य दलात सेवा दिल्यावर दोघांचाही अपघाती मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी मानले जात असून घाटे परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेनंतर अनेकांनी घाटे परिवाराचे सांत्वन केले.