scorecardresearch

आर्वी – कौडण्यपूर मार्ग आजपासून कायमस्वरूपी बंद, पावसामुळे पुलाची दैना

अमरावती व वर्धा जिल्ह्यातील वाहतुकीसाठी मुख्य मार्ग असलेला आर्वी-कौडण्यपूर मार्ग आजपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

आर्वी – कौडण्यपूर मार्ग आजपासून कायमस्वरूपी बंद, पावसामुळे पुलाची दैना
संततधार पावसाने या मार्गावरील पुलाची पार दैना उडाली आहे

अमरावती व वर्धा जिल्ह्यातील वाहतुकीसाठी मुख्य मार्ग असलेला आर्वी-कौडण्यपूर मार्ग आजपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. अत्यंत धोकादायी ठरल्याने दोन्ही बाजूस पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

संततधार पावसाने या मार्गावरील पुलाची पार दैना उडाली आहे. पुलाच्या डांबरचा थर पुरात उखडला आहे.चार ठिकाणी पंधरा ते वीस फूट लांबीचा थर उखडल्याने पुलाची स्थिती कमकुवत झाली आहे.

पौराणिक संदर्भ असलेल्या कौडण्यपूर येथे मोठे देवस्थान आहे. मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या विधीसाठी विदर्भातून येथे गर्दी उसळते. लोकांची मागणी झाल्यानंतर वर्धा व अमरावती जिल्ह्यास जोडणाऱ्या या रस्त्यावर गडकरी यांनी पूल बांधून दिला होता.

त्यानंतर येथील दळणवळण चांगलेच वाढल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्याम भुतडा सांगतात. मात्र पुरामुळे पुलाची दैना उडाल्याने वाहनांच्या अपघाताची शक्यता वाढली असल्याचे ते सांगतात. धोका लक्षात आल्यावर आर्वीचे तहसीलदार चव्हाण यांनी पुलाची जबाबदारी असलेल्या अमरावती बांधकाम विभागास तसेच पोलीस खात्यास खबरदार केले. त्याची तात्काळ दखल घेण्यात आली आहे.

पुलावरून कोणीही फिरकू नये म्हणून पोलीसही तैनात करण्यात आले आहे. तत्काळ काम सुरू व्हावे म्हणून प्रयत्न होत असल्याचे चव्हाण म्हणाले. हा पूल बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या