वाशीम : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या तालुका समूह संघटक, लेखापालाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करीत आशा, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्याकडे दाद मागितली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत कर्तव्यावर असूनही आशा, गटप्रवर्तकांना गैरहजर दाखविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा >>> प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’ची भाजपला अप्रत्यक्ष मदत; चिंचवडमध्ये मतविभाजनाचा महाविकास आघाडीला फटका
कामाव्यतिरिक्त इतर कामे सांगण्यात येतात, दौरा आटोपल्यानंतर कार्यालयात बोलावून तासनतास ताटकळत ठेवले जाते, कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते, आदी आरोप आशा, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही सिमा पडघान, मंदा जंजाळ, अर्चना डोंगरे, हर्षा खडसे, मंदा झांबरे, वनमाला शेळके, सिमा पट्टेबहादूर आदींच्या स्वाक्षरी असलेल्या निवेदनाद्वारे केली होती.
हेही वाचा >>> नागपुरात जी-२० च्या पाहुण्यांसाठी व-हाडी खाद्यपदार्थांचा बेत
या निवेदनाच्या अनुषंगाने जि.प. अध्यक्षांच्या यंत्रणेकडून पडताळणी केली असता, आशा व गटप्रवर्तकांवर अन्याय होत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. आशा गटप्रवर्तक हर्षा नितीन खडसे या कर्तव्यावर असूनही त्यांना गैरहजर दाखविण्यात आल्याचे जि.प. अध्यक्षांनी दिलेल्या चौकशी आदेशात नमूद आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, दोषी आढळून येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून अहवाल अवगत करावा, अशा सूचनाही जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिल्या आहेत.