शेतकऱ्यांचे प्रश्न, स्वतंत्र विदर्भावरून आशीष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र

भंडाऱ्याचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड करत राजीनामा देण्याच्या घटनेला दिवस उलटत नाही तोच विदर्भातील भाजपच्या आमदारानेही राज्यसरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. काटोलचे आमदार आणि भाजप नेते आशीष देशमुख यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य, युवक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे नमूद करून नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. शहरातील महत्त्वाकांक्षी असलेला मेट्रो रेल्वेचा प्रकल्प थांबवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती कार्यक्रम घ्यावा, असे सरकारला का वाटत नाही, असा प्रश्न उपस्थित करून या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आशीष देशमुख यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास कधीही होऊ शकत नाही. विदर्भाच्या विकासासाठी समर्पित असले तरी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी स्वत: आंदोलन केले. उपोषण आणि मोर्चे काढण्यात आले. त्यासाठी आश्वासन देण्यात आले. मात्र, त्याचा आपणाला विसर पडला असल्याची टीका केली आहे. विदर्भातील सिंचनासाठी राखून ठेवलेला पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे वळविण्यात आला. त्याचाच परिणाम  ३२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात सिंचनासाठी ७ हजार कोटीची तरतूद मात्र विदर्भाला गरजेपेक्षा कमी मिळत आहे. नागपूर आणि विदर्भाच्या युवकासमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भातील कोणत्याही जिल्ह्य़ामध्ये रोजगाराभिमुख पाहिजे तसे उद्योग नाहीत. मिहानसारख्या प्रकल्पाबद्दल किती चर्चा होत असली तरी त्याचा रोजगार निर्मितीसाठी काही उपयोग होत नाही. आंतरराष्ट्रीय नकाशावर आणणारा हा प्रकल्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मागे पडला आहे. विदर्भातील लहान उद्योग बंद झाले, त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले आहे, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.  सरकार शहरी विकासाचे प्रकल्प राबवून ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. कर्ज माफी केल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला. मात्र, कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. शेतकऱ्यांनी जावे कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला.  या संदर्भात देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला जे म्हणायचे होते, ते पत्रात मांडले असल्याचे सांगितले.

पत्रातील ठळक मुद्दे

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे तरी नागपूर नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालामध्ये नागपूर गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर, भ्रष्टाचार संपविण्यासाठी प्रयत्न होत असले तरी महाराष्ट्र आघाडीवर आहे.
  • कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर विदर्भाचे असताना आत्महत्या कमी होणे अपेक्षित असताना त्या वाढत आहे.
  • अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विदर्भाचे मात्र, विदर्भातील सिंचनासह इतर सर्व प्रकल्पासाठी अत्यल्प निधी.
  • उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विदर्भाचे आहेत. राज्यातील ७० टक्के वीज विदर्भात निर्माण होते. मात्र, पुरविली जाते ती पश्चिम महाराष्ट्रात.
  • विदर्भात कोळसा निर्माण होतो. मात्र, त्याचा विदर्भाला फायदा नाही.
  • यवतमाळ, बुलढाणा येथे शासनाचे टेक्सटाईल्स पार्क जाहीर करण्यात आले. मात्र, त्याचे काहीच झाले नाही.