audio recording of Congress Dheeraj Lingade and independent candidate Sharad Zambare on social media ppd 88 ssb 93 | Loksatta

काँग्रेसचाच उमेदवार म्हणतोय, ‘काँग्रेस पक्ष बोगस’; दोन उमेदवारांमधील संवादाची ध्वनीफित प्रसारित

मतदानाच्या ३६ तासांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे व अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्या संवादाची एक ध्वनीफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे.

Congress Dheeraj Lingade audio recording
काँग्रेसचाच उमेदवार म्हणतोय, ‘काँग्रेस पक्ष बोगस’ (image – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

अकोला : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाच्या ३६ तासांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे व अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्या संवादाची एक ध्वनीफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी ‘काँग्रेस पक्ष बोगस’ असल्याचे म्हटले. त्यामुळे, मतदानाच्या तोंडावर खळबळ उडाली आहे.

विधानपरिषद अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. त्याआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराची एक ध्वनीफित अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांनी समाजमाध्यमातून प्रसारित केली. यामध्ये शरद झांबरे यांनीच धीरज लिंगाडे यांच्याशी संपर्क साधून संवाद साधला आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीची ही ध्वनीफित असल्याचे लक्षात येते. या ध्वनीफितीमध्ये शरद झांबरे यांनी आपण कुठे असल्याची विचारणा केली. त्यावर धीरज लिंगाडे यांनी दिल्लीत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांमध्येही उमेदवारीवरून बोलणे झाले. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे तांगडे असेच असते. बघू या तरी. काँग्रेस पक्ष बोगस आहे.’ त्यावर झांबरे म्हणाले, ‘डॉ. ढोणेंसाठी नानाभाऊंना (नाना पटोले) ‘मॅनेज’ केले रणजीत पाटील यांनी, अशी चर्चा आहे.’ त्यावर ‘हो, तसच आहे ते,’ असे उत्तर लिंगाडे यांनी दिल्याचे ध्वनीफितीत ऐकू येते.

हेही वाचा – गळफास कसा घ्यायचा, काढायचा हे पाहत होता १२ वर्षीय मुलगा, अन्…; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

हेही वाचा – नागपूर : फेब्रुवारीत येणार पुन्हा १२ चित्ते, सामंजस्य करारावर स्वाक्षरी, स्वागताची तयारी सुरू

ही ध्वनीफित झांबरे यांनी मतदानाच्या ३६ तास अगोदर समाजमाध्यमातून प्रसारित करीत त्यामध्ये आपला व काँग्रेस उमेदवार लिंगाडेंचा संवाद झाल्याचा दावा केला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर झांबरेंनी ही ध्वनीफित प्रसारित करण्याचे कारण काय? यावरूनही आता शंका उपस्थित केली जात आहे. लिंगाडे यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने या संदर्भात त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:17 IST
Next Story
गळफास कसा घ्यायचा, काढायचा हे पाहत होता १२ वर्षीय मुलगा, अन्…; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना