अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारच्या आश्वासनानंतर नागपुरातील ‘महाएल्गार’ आंदोलन स्थगित केले. सरकारने हे आंदोलन गुंडाळले, बच्चू कडूंनी माघार घेतली, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्यावर बच्चू कडू यांनी आज पत्रकारांशी बोलताना सडेतोड उत्तर दिले.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आंदोलन यशस्वी झाले. तरीही आमच्यावर आरोप, टीका होत असेल, तर आम्हाला यापुढे आंदोलन करायचे की नाही, हा विचार करावा लागले. पण, आंदोलन आमच्या रक्तात आहे. आंदोलनांमुळे ३५० गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. आता या आंदोलनात ५० गुन्हे दाखल झाले आहेत. आम्ही ‘मॅनेज’ झालो असतो, तर तसे झाले असते का?, विरोधक म्हणताहेत आम्ही ‘मॅनेज’ झालो. तर यापुढे बाकीच्यांनी लढावे. आम्ही कर्जमाफीसाठी लढा उभारला, आता ते पूर्ण करण्याचे दायित्व आमच्यावर आहे. सरकारचे आहे, तसे आमचेही आहे. त्यासाठी मरण पत्करणेही पसंत करू. आता बाकीच्या प्रश्नांसाठी जे बोलणारे आहेत, त्यांनी लढावे. आरोपच होत असतील, बदनामी होत असेल, तर शेतकऱ्यांसाठी आता आंदोलन करायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. सर्व कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी लागेल. आम्ही तर कर्जमाफी निश्चितपणे मिळवून देऊ. आता बाकीच्या मुद्यांवर इतरांना लढू द्या, राज्यात भरपूर नेतेमंडळी आहेत. त्यांच्या आंदोलनात आम्ही जाऊ, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
बच्चू कडू म्हणाले, आंदोलन करणे अवघड असते. आंदोलनाच्या टप्प्यांवर काही निर्णय घ्यावे लागत असतात. आम्ही मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत तीन तास भांडलो. सरकार कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यास तयार नव्हते. दोन वेळा बैठकीतून उठून जाण्याची वेळ आली होती. पण, अखेर सरकारला झुकावे लागले आणि ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सरकारकडे निधीची कमतरता आहे, योग्य वेळी कर्जमाफी देऊ, अशी कारणे दिली जात होती. पण, अखेरीस सरकारने निर्णय घेतला हे महत्वाचे आहे.
बच्चू कडू म्हणाले, सरकारने कर्जमाफीसाठी जी समिती स्थापन केली, ती भ्रमित करण्यासाठी होती. त्या समितीला आता काहीच अर्थ उरलेला नाही. कारण सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळेल. शेतकऱ्यांच्या मनावरील ताण आता दूर झाला आहे.
