अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १३८ किलोमीटरची पदयात्रा सुरू झाली आहे. देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळ येथून सुरू झालेली ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्याकडे सरकत आहे. वाटेत सुकळी येथे शेतकऱ्यांनी शेतात चक्क भाजपचे झेंडे रोवून लक्ष वेधून घेतले आहे.
शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. आता पेरणी बंद. आता सरकारने आमची जमीन घ्यावी, नाहीतर गांजा, अफूचे पीक घेऊ द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ज्या शेतामध्ये भाजपचे झेंडे रोवण्यात आले तेथे पदयात्रेदरम्यान थांबून बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. बच्चू कडू म्हणाले, केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे, जिल्हा परिषद त्यांची, महानगर पालिका त्यांची. घरांवरही भाजपचेच झेंडे होते, आता शेतातच झेंडे शिल्लक होते. शेतकऱ्यांनी शेतातही ते लावून टाकले आहेत. कारण शेतात पेरणी करून काहीच फायदा नाही. पेरणीचा खर्च देखील निघत नाही, अशी बिकट अवस्था आज आहे. प्रति क्विंटल ३४०० रुपये सोयाबीनला भाव मिळाला. चार क्विंटल पिकली. एका एकरातून सोयाबीनला १२ हजार रुपये मिळाले आणि एका एकरासाठी ८० हजार रुपये खर्च आला. मग, शेतकऱ्यांनी पीक घेतल्यापेक्षा झेंडे लावले तर काय बिघडले, आम्ही आता शेतासहीत तुमच्या पक्षात येतो. कमळ लागले की, घेऊन टाकत जा तुम्ही, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.
सुकळी येथील शेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे लावून सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला असतानाच शेतात लावलेले फलक देखील लक्ष वेधून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार हे बैलगाडीवर बसल्याचे छायाचित्र या फलकावर आहे. आता पेरणी करणे बंद, गोरगरीब लोकांच्या जीवावर उठलेले म्होरके, आता एकतर गांजा, अफूचे पीक, नाहीतर पक्षाचे झेंडे, असा उल्लेख या फलकावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन सरकारनेच दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी कोणती समिती गठीत केली काय? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती कशाला तयार करत आहेत, थेट घोषणाच केली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.