अमरावती : गडचिरोलीतील खाणींमधून काढलेला माल रत्नागिरीपर्यंत गेला पाहिजे, तेथून तो जहाजातून विदेशापर्यंत गेला पाहिजे, म्हणून एका उद्योगपतीच्या कंपनीसाठी ८० हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ मार्ग उभारणार आणि शेतकऱ्यांना साधी कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करीत असाल, तर खबरदार. आता आमची गांधीगिरी संपली आहे. आमची भगतिसिंहगिरी सुरू झाली आहे, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे.
शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जात आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात परतवाडा ते अमरावती मार्गावर गुरूवारी सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलकांसमोर बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर प्रहार केला.
बच्चू कडू म्हणाले, ही लढाई आता थांबणार नाही. पुढील आंदोलन आता शेतमालाच्या हमीभावासाठी असणार आहे. हमीभावाच्या किमतीच्या वीस टक्के बोनस देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण, सरकार आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी हमीभाव देखील देऊ शकले नाही. ही शोकांतिका आहे. हे सरकार उद्योगपतींचे आहे. उद्योगपतीसाठी शक्तिपीठ महामार्ग उभारला जातो, मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. आता कोणालाही न सांगता मंत्रालयात शिरून आंदोलन करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
तुमचे कृषिमंत्री भर सभागृहात रमी खेळतात, हे तुमचे रामराज्य आहे का, आमचा गोरगरीब शेतकरी आर्थिक संकटातून आत्महत्या करतोय, त्याची जाणीव सरकारला आहे का, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, सरकारने एसटी बसच्या प्रवासभाड्यात वाढ केली. एकीकडे, बहिणींना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत द्यायची आणि दुसरीकडे, भावाकडून तिकिटाचे दुप्पट पैसे वसूल करायचे, हे सरकारचे उफराटे धोरण आहे. भावाला लुटायचे आणि बहिणीला मोफत द्यायचे, हा नवीन धंदा सरकारने सुरू केला. दोन डझन केळींचे भाव वसूल करायचे आणि हाती दोनच केळी द्यायची, हे सरकारचे धोरण आहे. आमची लढाई ही कर्जमाफीपुरती मर्यादित नाही. येणारी लढाई आम्ही हमीभावासाठी केल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा बच्चू कडू यांनी दिला.
अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अमरावती- चांदूर रेल्वे महामार्ग मेंढपाळांनी रोखून धरला. हजारो मेंढ्या रस्त्यावर आणल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प पडली होती.