अमरावती : विरोधकांच्या चुकीच्या वागण्यामुळेच मी आज अध्यक्षपदी आहे. अल्पमत असूनही सत्ता आमच्याकडे आहे, त्यामुळेच विरोधकांकडून कारवाया केल्या जात आहेत. पण बँकेला आम्ही प्रगतीच्या मार्गावर नेले आहे, असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केला.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बच्चू कडू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत आहोत, पण बँकेतील विरोधी संचालक हे राजकारण करण्यात गुंतलेले आहेत, असे ते म्हणाले.

बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू व उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संचालक नरेशचंद्र ठाकरे, आनंद काळे, जयप्रकाश पटेल, अजय मेहकरे, सुनील वऱ्हाडे, बाळासाहेब आळोणे, चित्रा डहाणे, सुरेखा ठाकरे, मोनिका मार्डीकर आदी संचालक उपस्थित होते.

मात्र विरोधी गटातील नऊ संचालक गैरहजर होते. बँकेचे संचालक बबलू देशमुख यांच्या गटाने मागील सभेला नियमबाह्य ठरवत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे त्यांच्या गटातील फक्त दोन संचालक उपस्थित होते.

बँकेच्या कामगिरीचा आढावा देताना कडू यांनी सांगितले की, कर्ज वाटपात १६५ टक्के वाढ झाली असून बँक आज नफ्यात आहे. गावपातळीवरील सोसायट्यांना मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. बँकेच्या ठेवींमध्ये १९७ कोटींची वाढ होऊन एकूण ठेवी २३०० कोटींवर पोहोचल्या आहेत, तर शेअर भांडवल ३ हजार कोटींपर्यंत गेले आहे. याशिवाय ४९ कोटींचे इतर कर्जही वितरित केले आहे.

बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनीही बँकेच्या कामकाजात विरोधक हे विनाकारण अडथळे आणत असल्याचा आरोप केला. आता यापुढे सर्व ठराव सर्वसाधारण सभेतच मंजूर करून घेऊ, असे ते म्हणाले.

या सभेत विषयसुचीवरील सात मुद्द्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये बँकेचे विषय पत्रके, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक मंजूर, २०२४-२५ च्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेला खर्च मान्य, २०२५-२६ चे अंदाजपत्रक मंजूर, भागभांडवल वाढविण्याचा ठराव, संधी लेखापाल अहवाल व दोषदुरुस्तीचा अवलोकन, नवीन संधी लेखापरीक्षकाची नियुक्ती, तसेच सदस्यांकडून उपस्थित केलेल्या अनुकंपा भरतीस मान्यता देण्यात आली. नुकसानग्रस्तांना मदत आणि वादग्रस्त ठरलेल्या भेटवस्तूंचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, त्यावर आमसभेत सदस्यांना भेटवस्तू घरपोच देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नियमितपणे सांस्कृतिक भवन येथे सभा घेण्याचा ठरावही झाला.