अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपुर्वी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा केली आहे. ही तारीख त्यांना पाळावीच लागणार आहे. कर्जमाफीच्या दिशेने जर सरकारने हालचाली केल्या नाहीत, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मतदान करू नका, असे आवाहन आपण शेतकऱ्यांना करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
बच्चू कडू यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना कर्जमाफीविषयी अनेक मुद्दे मांडले. ते म्हणाले, कर्जमाफीचा पैसा हा बँकांकडे जातो. आज शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. त्याला तातडीच्या मदतीची गरज आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जात आहे. ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफी मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षातील कर्जाची परतफेड करण्याची गरज पडणार नाही. अस्मानी संकटामुळे हे कर्ज फेडणे शक्यही होणार नाही. आता शेतकऱ्यांना पुढील हंगामात कर्ज मिळावे, यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. सरकार जर कर्जमाफीच्या दिशेने हालचाली सुरू करणार नसेल, तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन आपण करू.
बच्चू कडू म्हणाले, आमचे आंदोलन यशस्वी झाले. आंदोलनादरम्यान अनेक अडथळे आले. पावसामुळे आंदोलकांचे हाल झाले. आंदोलनाच्या अखेरीस कमी संख्या असूनही आम्ही सरकारला दखल घेण्यास भाग पाडले. कर्जमाफीच्या तारखेची घोषणा झाली, तरी आमची बदनामी होत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायला निघालो आहे. पण, निराशेतून आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल का, याची भीती वाटत असल्याचे भावनिक उद्गार बच्चू कडू यांनी काढले.
बच्चू कडू म्हणाले, आमच्यावर आरोप करणाऱ्यांना आम्ही न्यायालयात खेचू. पाच वकिलांची चमू त्यासाठी कामाला लागली आहे. आमच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली जाते, त्याचे वाईट वाटते. या आंदोलनात एकाही जणाला साधी जखमही झाली नाही, तरी सरकारला झुकावे लागले, हे आमच्या आंदोलनाचे यश
आहे. पंजाबच्या शेतकरी आंदोलनाला दु:खाची किनार आहे. घरी बसून आंदोलन कसे करावे, असा सल्ला देणे सोपे असते. विरोधकांनी एक तरी आंदोलन करून दाखवावे. कर्जमाफीचा मुद्दा आम्ही राज्यभरात चर्चेत आणला. सरकारला आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडले. राज्यभरातील शेतकरी नेते एकत्र आले. या सर्वांच्या एकजुटीचा हा विजय आहे.
