वर्धा : सर्जा राजा हे नाव जोडीने येताच बैलजोडीच डोळ्यांपुढे येते. पाठोपाठ खिल्लारी हा शब्द. कारण पंढरपूर येथील हे वाण भारतात प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने पंढरपूरची पालखी वाहण्याचा मान याच बैलजोडीस मिळतो. त्यासाठी विशिष्ठ पद्धतीने निवड केल्या जात असते. खिल्लारी बैलांच्या विविध प्रजाती आहेत. त्यात माणदेशी, कर्नाटकी, पंढरपूरी या प्रमुख आहेत. पांढराधमक रंग, ऐटबाज शिंगे, काटक, उंच, पाणीदार तीक्ष्ण डोळे, ताकदवान, तापट पण तेवढेच हुशार असे हे जनावर समजल्या जाते. शेतकाम आणि शर्यतीत सर्वात पुढे. म्हणून त्याची किंमतही महाग. चार लाख ते वीस लाख रुपयांपर्यंत जोडीची किंमत जात असल्याचे जाणकार सांगतात.

आता हाच बैलांचा राजा वर्धेकरांना बघायला मिळणार आहे. रामनगर येथील शहीद भगतसिंग व्यायाम मंदिर व रामनगर पोळा उत्सव समिती रामनगर मैदानावर गेल्या २६ वर्षांपासून बैलांचा पोळा आयोजित करीत असते. वर्षभर राबणाऱ्या या बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आयोजित हा सोहळा विदर्भात प्रसिद्ध व्हावा म्हणून जोडीला कृषी प्रदर्शनी घेण्याची भूमिका आमदार असतानाच डॉ. पंकज राजेश भोयर यांनी मांडली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या पोळा उत्सवास विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे सुरू झाले. आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवीत असताना डॉ. भोयर यांनी हा सोहळा शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरावी म्हणून आता त्यास वेगळे स्वरूप दिले आहे.

कृषी प्रदर्शनीत पंढरपुरी बैलांच्या सहा जोड्यांची हजेरी लागणार आहे. संदीप चिचाटे व चमू शेतकरी गाणी, नृत्य व अन्य लोककला सादर करतील. कृषी प्रदर्शनीत विविध अनुदान योजनांची माहिती, पिक संरक्षण यंत्रणा, नवे कृषी तंत्रज्ञान व कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार.

२२ ऑगस्टला दुपारी चार वाजता सुरू होणाऱ्या या उत्सवास सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार व पालकमंत्री डॉ. भोयर यांची प्रमुख हजेरी तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष नरेश गुजर यांनी दिली.

पंचक्रोशीतील शेतकरी व वर्धेकर नागरिक या उत्सवाची आतुरतेने वाट बघतात. त्यामुळे आयोजन नेटके करण्याची भूमिका असते, असे गुजर म्हणाले. बाजार समितीचे संचालक विशाल तिवारी तसेच गोरक्षण समितीचे वसंत पंचभाई, राजेश क्षीरसागर व अन्य पदाधिकारी आयोजनात सहभागी आहेत. उत्सवात दरवर्षी विविध मान्यवरांनी आजवर हजेरी लावली आहे. यावर्षीचा हा सोहळा पण दिमाखदार करण्याचा चंग आयोजकांनी बांधला आहे.