गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पोळा आणि मारबत सण साजरा केला जातो. या दिवशी मांसप्रेमी मोठ्या प्रमाणात मांस खरेदी करतात.त्याच वेळी, वन्यजीव शिकाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय होतात आणि चार पैसे अधिक मिळवण्यासाठी जंगलात सापळा लावून वन्यजीवांची शिकार करतात.यासाठी काही जण एकत्रित होऊन योजना तयार करण्यात येते. हे लक्षात घेऊन, पोळा आणि मारबतच्या आधीपासूनच वन विभाग सतर्क आहे आणि दिवसरात्र जंगलात गस्त घालत आहे.
या पूर्वी अशा सणावारावर वा उत्सवात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांना मांस आणि इतर वस्तूंसह अटक करण्यात आली आहे. हे लक्षात घेता, वन विभाग सतर्क असून गस्त घालत आहे आणि शिकारींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, सालेकसा,गोंदिया ही जंगले नागझिरा अभयारण्याच्या बफर झोनला लागून आहेत. त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांची वर्दळ नेहमीच दिसून येते.
पोळा आणि मारबत सणानिमित्त या भागात शिकारींच्या टोळ्या अधिक सक्रिय झाल्या आहेत आणि वन्य प्राण्यांची शिकार करण्याची योजना आखत आहेत. अशी माहिती वन विभागाला मिळाली असल्यामुळे अशा शिकारींच्या टोळ्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्यासाठी, वन विभागाचे पथक उत्सवाच्या आधीपासून दिवसरात्र जंगलात गस्त घालत आहे. अशी माहिती गोंदियाच्या वन विभागाने दिली आहे.
बिबट्याने दोन शेळ्या केल्या फस्त गावात पसरली दहशत…
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या तुकुम सायगावमध्ये एका बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांना मारले. ही घटना २१ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी स्थानिक रहिवासी चिंतामण कोमोती यांनी गोठ्यात शेळ्यांना बांधले होते. सकाळी दोन शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. चौकशीत असे आढळून आले की बिबट्याने शेळ्यांना मारले आहे. घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. सध्या ग्रामस्थांनी बळी पडलेल्या पशुपालकाला भरपाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे बळी पडलेल्या पशुपालकाला सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाला असल्याचा अंदाज आहे.