नागपूर : प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या सर्जा- राजाची पूजा करून बैलपोळा सण उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी घरासमोर पळसाच्या झाडाची मेढी लावण्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्रीयही कारणे आहेत. या कारणांसह मोठ्या प्रमाणात पळसाची फांदी दारावर लावण्यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबतही आपण इंदुताई गायकवाड पाटील आयुर्वेदिक काॅलेज ॲन्ड रिसर्च सेंटर, धुटी, नागपूरचे प्राचार्य डॉ. मोहन येंडे यांच्याकडून जाणून घेऊ या.
धार्मिक, सांस्कृतिक, शास्त्रीय कारणे कोणती?
पळसाला ‘वनस्पतींचा राजा’, ‘ब्राह्मवृक्ष’ असेही म्हटले जाते. शुभ कार्यासाठी पळसाची फांदी वापरण्याची प्रथा प्राचीन आहे. पोळ्याचा सण बैल, जनावरांसाठी असतो. पळसाचे झाड श्री विष्णू आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे समृद्धी, उन्नती आणि शुभ फलाची कामना म्हणून पळसाची फांदी दारावर ठेवली जाते. पळसाची पाने यज्ञ, हवन, व्रत-उपवास यामध्येही वापरली जातात. जैविक दृष्टिकोनातून पळसाच्या फांदीत कीटकनाशक गुणधर्म असतात. घराच्या दाराशी ही फांदी ठेवली तर उंदीर, डास, कीटक यांना दूर ठेवते. पळस झाडाची पाने व फुले वातशामक व शुद्ध करणारी असतात. त्यामुळे वातावरण स्वच्छ राहते. जनावरांचा सण असल्यामुळे पळसाची पाने व फुले यांचे औषधी मूल्य त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. पाने पचायला हलकी, रक्तशुद्धीकारक व पचनशक्ती वाढवणारी मानली जातात. म्हणूनच पोळ्याच्या दिवशी घराच्या दाराशी पळसाची फांदी ठेवण्याची प्रथा आहे. दुसऱ्या दिवशी या फांद्या पेटवल्या जात असल्याने त्यातून होणाऱ्या धुरीमुळे किटक कमी होतात. तर धार्मिक महत्त्वाबरोबरच औषधी व पर्यावरणीय लाभही आहेत, असे डॉ. मोहन येंडे यांनी सांगितले.
संभावित हानी कोणती ?
पळसाची फांदी पोळ्याला दारावर ठेवताना काही संभाव्य हानिकारक बाजूही आहे. त्यात पर्यावरणीय दृष्टीने बघितल्यास झाडांचे नुकसान होते. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पळसाच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे पळसाची झाडे कमकुवत होतात, वाढ खुंटते, आणि हळूहळू झाडांची संख्या कमी होण्याचा धोका वाढतो. जैवविविधतेवर परिणामाच्या दृष्टीने बघितल्यास पळसाच्या झाडावर अनेक पक्षी, किडे, फुलपाखरे आपली घरटी करतात किंवा फुलांवर उपजीविका करतात. फांद्या तोडल्याने त्यांचे निवासस्थान कमी होते, असेही डॉ. मोहन येंडे यांनी सांगितले.
आरोग्याच्या दृष्टीने हानी कोणती?
पळसाच्या सुकलेल्या फांद्या घराजवळ सडल्यास डास व जंतू निर्माण होण्याचा धोका राहतो. काही लोकांना पळसाच्या झाडाच्या फुलांपासून किंवा पानांपासून अॅलर्जी होऊ शकते (त्वचारोग, शिंका, खाज), सामाजिक दृष्टीने मोठ्या प्रमाणात फांद्या तोडल्यामुळे झाडांची संख्या घटल्यास भविष्यात ही परंपरा टिकवणे कठीण होईल. शहरी भागात झाडांची कमतरता आधीच आहे, त्यामुळे पळस झाडे तोडल्यास सावली व हरितावरण कमी होईल असेही डॉ. येंडे यांनी सांगितले.