अकोला : प्रभू श्री रामचंद्राने सर्व घटकांना एकत्र करत समता, एकता, न्यायप्रियता आदी मूल्य व्यवस्था असलेले आदर्श रामराज्य निर्माण केले. संत सेवालाल महाराज यांनी हा आदर्श अनुसरत प्रत्येकात राम जागविण्याचा प्रयत्न केला. बंजारा समाजाचा इतिहास शौर्य, पराक्रम व त्यागाचा आहे.

बंजारा काशी पोहरादेवी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने नंगारा भवन, संस्कृती परंपरेचे दर्शन घडविणारे संग्रहालय अशी अनेक कामे पूर्ण केली. उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

श्रीराम नवमी सोहळा आणि संत सेवालाल महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा बंजारा काशी पोहरादेवी येथे झाला. काही तांत्रिक अडचणींमुळे मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सई डहाके, संजय कुटे, राजेश राठोड, तुषार राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बंजारा प्राचीन समाज असून, ऋग्वेदातही त्याचा उल्लेख आढळतो. या समाजाचे देशात पुरातन काळापासून व्यापार, वाहतूक क्षेत्र समृद्ध करण्याबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. समाजाच्या प्रगतीसाठी शासनातर्फे संत सेवालाल महाराज तांडा सुधारणा समिती, तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा यासह अनेक निर्णय, तसेच नवीन योजना व उपक्रम हाती घेतले आहेत. पोहरादेवी या पवित्र स्थळी भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण केली जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री नाईक व विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम तसेच आरती झाली. मंत्र्यांनी श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. पोहरादेवी येथील सोहळ्याला मोठा जनसागर उसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेले नंगारा संग्रहालय सर्वसामान्य पर्यटकांसाठी कालपासून खुले झाले आहे. ते पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.