अकोला : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. सकल बंजारा समाजाच्यावतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात वाशीम जिल्ह्यातील मानोरा शहरात बुधवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा नागरिक सहभागी झाले होते.

समाजाच्यावतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तालुका प्रशासनामार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवण्यासाठी आता बंजारा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय सहन करीत असलेल्या बंजारा समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता. मानोरा शहरातील संत सेवालाल महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग महाराज यांच्यासह अनिल राठोड, रमेश महाराज, संजय महाराज, सुनील महाराज, जितेंद्र महाराज, गोपाल महाराज, यशवंत महाराज, समनक जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. अनिल राठोड, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, गोरसेना, गोरसिकवाडी, राष्ट्रीय बंजारा परिषद आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा समाजातील सर्व पक्षातील राजकीय नेते, चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, शहर व प्रत्येक तांड्यातील जागरूक नागरिक व तरुण मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

या आरक्षण मागणीच्या आक्रोश मोर्चात हजारो बंजारा समाजाने सहभाग नोंदवून आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावी, यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. एसटी संवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या बजारा समाजातील हजारो नागरिकांकडून जोरदार नारेबाजी करण्यात आली. या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

सामाजिक दृष्ट्या अतिशय माघारलेल्या व नियम व निकषात बसत असल्यामुळे राज्यातील बंजारा समुदायाला राज्य शासनाकडून निश्चितच कुणाही अन्य मागासवर्गीय समाजावर अन्याय न करता आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलली जातील व बंजारा समाजातील ज्या लोकांनी हे आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष केले आहे त्यांच्या संघर्षाचा आदर राज्य शासन नक्कीच करेल, असा विश्वास आमदार बाबूसिंग महाराज यांनी व्यक्त केला.