अकोला : राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्था ढासळली. पोलिसांकडून मुजोरीची वागणूक दिली जात आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असतांना सत्ताधारी पक्षाचे मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांना चक्क बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला. गोवंशाच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून ठाणेदाराला आमदार व त्यांच्या कार्यकर्त्याने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्याने संतापाच्या भरात ठाणेदाराने शिवीगाळ केली. या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांनी थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देऊन ठाणेदाराला निलंबीत करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघातून आमदार हरीश पिंपळे सलग चारवेळा निवडून आले आहेत. त्यांच्या मतदारसंघातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक एका ट्रकमधून करण्यात येत असल्याच्या संशय भाजप कार्यकर्ते हरीश वाघ यांना आला. त्यांनी याची माहिती बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश टुंकलवार यांना दिली. पोलिसांनी ते वाहन सोडून दिले. संबंधित कार्यकर्त्याने याची माहिती आमदार हरीश पिंपळेंना दिली. आमदारांनी ठाणेदारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केल्यावर ठाणेदारांनी असभ्य भाषेत संवाद साधला. आमदारांकडे तक्रार केल्यामुळे संतापाच्या भरात ठाणेदारांनी भाजपच्या त्या कार्यकर्त्याशी पुन्हा भ्रमणध्वनीवर संपर्क साधत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या प्रकाराची ध्वनीफित प्रसारीत झाली आहे. कार्यकर्त्याने हा प्रकार आमदारांच्या कानी घातल्यावर त्यांनी पुन्हा ठाणेदाराशी संपर्क केला. तर त्यांना देखील ठाणेदाराने शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची आमदार हरीश पिंपळे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणा संदर्भात पोलीस अधीक्षक बच्चनसिंह व संबंधित ठाणेदारांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
…तर आमदाराची इज्जत राहणार नाही
असभ्य वर्तणूक केल्याप्रकरणी ठाणेदारवर तत्काळ कठोर कारवाईची पाऊले उचलावी. गृह खाते आपल्याकडे आहे. कारवाई झाली नाही तर राजकीय क्षेत्रात आमदारांची यापुढे इज्जत राहणार नाही. त्यामुळे अशा ठाणेदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
हक्कभंग दाखल होणार
गोवंशाच्या कत्तलीसाठी अवैध वाहतुकीच्या संशयावरून बार्शीटाकळीच्या ठाणेदारांशी संपर्क साधला, त्यांनी माझ्यासह कार्यकर्त्याला शिवीगाळ केली. या प्रकरणी तत्काळ कारवाईची मागणी गृहमंत्री, विधानसभा अध्यक्ष व अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. या प्रकरणी हक्कभंग दाखल करणार आहे, असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.