बुलढाणा: मागील आठवठभर सुरू असलेल्या अवकाळीच्या थैमानामुळे आटपाट बुलढाणा नगरीच्या डोईवरील आकाश ढगांनी व्यापलेले राहिले. मात्र आज पावसाने विसावा घेतल्याने याच आकाशात नयनरम्य प्रकाश आणि अंधाराचा खेळ आणि नवरंगांची मुक्त उधळण पहावयास मिळाली. यामुळे हजारो बुलढाणावासी मंत्रमुग्ध झाले. मागील आठवड्यापासून बुलढाणा परिसरात अवकाळी पाऊस, विजा अन वादळी वाऱ्यासह मुक्कामी आहे.
हेही वाचा >>> बुलढाण्याच्या तापमानात प्रचंड घट; उन्हाळ्यात हिवाळ्यासारखे तापमान
यामुळे वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट नियमित बाब ठरली. या रोज होणारी संध्याकाळ, सूर्य अस्ताला जाताना होणारी रंगांची मुक्त चौफेर उधळण अन प्रकाश- अंधाराचा आकर्षक खेळ याला रसिक बुलढाणेकर मुकले होते. मात्र आठ दिवस तांडव करणारा निसर्ग शांत झाल्याने संध्याकाळचा अद्भुत नजारा पहावयास मिळाला. ही नयनरम्य संध्याकाळ संघ परिवारातील पदाधिकारी तथा निवृत्त प्राध्यापक विजय जोशी यांनी आपल्या कॅमेऱ्यात तेवढ्याच सुंदररित्या टिपली आहे.