‘माझा प्रियकर अक्षयच्या मृत्यूमुळे मी पूर्णपणे खचली आहे. त्यामुळे मला जगण्याची इच्छा नाही. आता स्वर्गात गेलेल्या माझ्या अक्षयसोबत मी सुखाने जगू शकेल, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे,’ अशी चिठ्ठी लिहून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. अनामिका दंदरे (रा. गोपालनगर, नागपूर) असे मृत तरूणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी गार्डन जवळील, सौभाग्य रेस्टारेंटच्या गच्चीला लागून असलेल्या उंबराच्या झाडाला एका तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तरुणीने हाताला व मनगटाला धारदार ब्लेडने चिरे मारलेले होते. पोलिसांना तिच्याजवळ एक चिठ्ठी मिळाली. त्यावरून तिची ओळख पटली. तिचे नाव अनामिका दंदरे असल्याचे पोलिसांना समजले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनामिकाने ‘जीवनाला कंटाळली असून माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये.

मी प्रियकरासोबत सुखी राहणार आहे.’ असे लिहिले होते. दरम्यान पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिकाचा प्रियकर अक्षय याचा तीन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती नैराश्यात होती. तेव्हापासून तिच्या वागण्यात फरक पडला होता. तिने यापूर्वीही जगण्यात अर्थ नसल्याचे सांगून आत्महत्या करण्याबाबत विचार बोलून दाखवला होता. आईवडिलांना एकुलती असलेली अनामिका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षांला शिक्षण घेत होती. याप्रकरणी हॉटेलमालक कमलेश मनोहर राऊत (वय ४२) यांनी दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.