नागपूर : नवी शैली, नवा घाट, नवा विचार मांडण्याच्या नादात टीकेचे नवनवीन ‘स्वयंवर’ घडवून आणणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ‘रिकामटेकड्यांचा उद्याोग’ संबोधून जाहीर वादाला तोंड फोडले होते. आता या वादाचा दुसरा अंक वेगळया अर्थानी गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरले ते साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांची नेमाडेंशी झालेली ‘अनपेक्षित’ भेट.

‘‘कवितेत एकदा शिरले की तुम्ही स्वत:लाच विसरून जाता’’ असे सांगणारे नेमाडे मागच्या काही महिन्यांपासून विश्वाशी एकरूप होताना दिसले नाहीत. शनिवारी, १४ जून रोजी मात्र त्यांचे एक छायाचित्र समोर आले. यात साहित्य महामंडळाचे ‘बिढार’ खुद्द नेमाडेंच्या माजघरात बसलेले दिसत आहे. नेमाडेंच्या भाषेतील ‘रिकामटेकड्यांचा उद्याोग’ यंदा साताऱ्यात आयोजित करण्यात आला आहे. ठिकाण ठरले असले तरी या उद्याोगाचे ‘नेतृत्व’(संमेलनाध्यक्षपद) कोणाकडे जाणार हे ठरलेले नाही.

आता मात्र नेमोडे आणि संमेलनाची अविश्वसनीय वाटणारी ‘मेलडी’ नव्याने रचण्याचा प्रयत्न ‘मसाप’कडून होत असून त्याच उद्देशाने ‘मसाप’चे कार्याध्यक्ष व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी नेमाडेंना पूर्वसूचना न देता शनिवारी भल्या सकाळी ‘सांताक्रुज’ गाठल्याची चर्चा आहे. आता ही भेट ‘हूल’ ठरते की ‘झूल’ हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.पण, या निमित्ताने ही ‘देखणी’ भेट चर्चेत आली आहे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असे सांगणारे नेमाडे कवितेच्या द्रव्याची हवा होण्याआधी ती साहित्य संमेलनाच्या मंचावरून अमूर्त करण्यासाठी ‘संमेलनाची समृद्ध अडगळ’ स्वीकारतील की आपल्या पूर्वविधानांशी एकनिष्ठ राहतील, हा खरा प्रश्न आहे.

यवतमाळच्या साहित्य संमेलनावेळी नेमाडेंना संमेलनाध्यक्ष करा, असा प्रस्ताव दिला होता. पण, त्यावेळी नेमाडेंचा आणि संमेलनाचा ३६ चा आकडा असल्याने ‘मसाप’चा ‘देशीवाद’ काही कामी आला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमाडे सरांशी माझा अनेक वर्षांचा स्नेह आहे. अक्षरधन या ग्रंथात त्यांचा लेख समाविष्ट असल्यामुळे या ग्रंथाची प्रत त्यांना प्रत्यक्ष भेटून द्यावी म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. ही स्नेहभेट होती. या भेटीत साहित्य संमेलनासह अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. – प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ.