भंडारा : काल जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. तुमसर तालुक्यातील वादळी पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान तालुक्यातील सुंदरटोला येथे रात्र पाळीत कर्तव्य बजावून घराकडे परत येण्यासाठी निघालेल्या एका कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर झाडाची भली मोठी फांदी पडल्याने त्याखाली दबून या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरचंद कोडावते हे चिखला माइन्समध्ये सरकारी कर्मचारी होते. दोन दिवसांपूर्वी कर्तव्य बजावून ते घराकडे जाण्यासाठी निघाले. घरी जाण्यापूर्वी गोबरवाही येथे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून परत येत असताना, सुंदरटोलापासून सुमारे ४ किमी अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या पलाश झाडाची एक मोठी फांदी अचानक तुटून त्यांच्यावर पडली.
सुरचंद काही काळ झाडाच्या फांदीखाली अडकले. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेने तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरचंद यांचा मुलगा आतिश कोडावते (३०) याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. रस्त्याच्या कडेला असलेली जीर्ण झाडे वेळेवर तोडली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. पावसाळ्यात मोठ्या फांद्या पडण्याचा धोका आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नाही. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मृतांच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.