भंडारा : दारूमुळे मुलाबाळांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, संसार उदध्वस्त होत आहे, मुलांचे भविष्य घडवायचे कसे ? आम्ही जगायचे कसे? असे सवाल करत तई बुज गावातील महिलांनी एल्गार पुकारला. गावात फोफावलेल्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात गावच्या महिला मुलांना घेऊन रस्त्यावर उतरल्या. दारू विक्री विरोधात नारेबाजी करत जनजागृती मोर्चा काढला.
लाखांदूर तालुक्यातील तई/बुज हे छोटेसे गाव. मागील अनेक वर्षांपासून गावात अवैध दारूचा व्यापार सर्रास सुरू होता. काही विक्रेते रात्रं दिवस दारू विकून गावातील वातावरण दूषित करत होते. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या व्यसनाचे बळी पडले होते. प्रत्येक घरात कलह आणि अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस प्रशासनाला याबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून दारू विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. आपले काहीही वाकडे करू शकत नाही अशा अविर्भावात त्यांचा हा व्यवसाय गावात अविरत सुरू होता. याबाबत ग्रामपंचायतने देखील दारू विक्रेत्यांना नोटीस दिली होती मात्र त्याचाही परिणाम झाला नाही.
अखेर गावाला दारू मुक्त करण्यासाठी महिला पुढे सरसावल्या. दारूबंदीसाठी महिलांनी रुद्र अवतार धारण केला. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी ग्रामसभेत ग्रामपंचायत आणि तंटामुक्ती समितीने एकमताने एक ठराव मंजूर केला. या ठरावानुसार १५ सप्टेंबरपासून गावात अवैध दारू विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली.
या ठरावानुसार, १५ सप्टेंबर रोजी हजारो महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्राम सुरक्षा दलाचे कर्मचारी महिला बचत गट, शिक्षक आणि विद्यार्थी, तंटामुक्त समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, विविध समित्यांचे अधिकारी रस्त्यावर उतरले. जनजागृती रॅली दरम्यान “दारूबंदी” ची मागणी करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
गाव आणि संसार वाचवण्यासाठी महिलांनी उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य असून यानंतर गावात दारूबंदी कायमस्वरूपी राहणार का हा प्रश्न मात्र उरतोच. मात्र ही केवळ एक मोहीम नसून गावाची क्रांती आहे असा संदेश या महिलांनी दिला आहे. दारूबंदी मोहिमेला पोलीस प्रशासनाने देखील पाठिंबा दर्शवला.
भविष्यात दारू विक्री करणारा व्यक्ती कोणत्याही कोणत्याही सरकारी लाभासाठी पात्र राहणार नाही, असेही ग्रामपंचायतीने स्पष्ट केले. सरपंच श्रीहरी भांडारकर, उपसरपंच मोरेश्वर नान्हे, व्हीएमएस अध्यक्षा सुनीता धकाते, पोलीस पाटील चंद्रशेखर ढेर, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सुरक्षा पथक, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि मोठ्या संख्येने गावातील महिला, तरुण आणि पुरुष उपस्थित होते. कडक पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.