भंडारा : शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये शासनाच्यावतीने पोषक आहार योजना राबवण्यात येते. मात्र निकृष्ट दर्जाचा पोषण आहार शाळा आणि अंगणवाड्यांमधून दिला जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. असाच एक प्रकार पवनी नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये उघड झाला.

स्वातंत्र्यदिनी अंगणवाडीतील बालकांना चिवडा आणि सोनपापडीचे वाटप करण्यात आले. मात्र या सोनपापडीला बुरशी लागलेली होती. त्यात अळ्याही आढळल्या. या प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर आता या पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रशासन मुलांच्या आरोग्याशी आणि जीवाशी का खेळत आहे असा उद्विग्न प्रश्न यावेळी पालकांनी उपस्थित केला आहे

महिला बाल प्रकल्प विभागाकडून या बुरशीयुक्त सोनपापडीचे वाटप करण्यात आले होते. पवनी नगरपरिषद क्षेत्रांतर्गत एकूण ३८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या संपूर्ण अंगणवाड्यात शासनाकडून पोषण आहार योजना राबविण्यात येते. अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार शिजविण्याचे कंत्राट बचत गटांना देण्यात आले आहे.मात्र बचत गटाच्या माध्यमातून १५ ऑगस्टला स्वतंत्र दिनी बालकांना भाईतलाव वॉर्ड, घोडेघाट वॉर्ड, सोमवारी वॉर्ड व विठ्ठल गुजरी वार्डातील ९ अंगणवाडीत समृद्धी महिला बचत गट आणि आनंदी महिला बचत गटामार्फत चिवडा आणि सोनपापडीचे वाटप करण्यात आले. परंतु सदर आहारात बुरशी, अळ्या असलेला आहार पुरवठा झाल्याचे लक्षात येताच अंगणवाडी सेविकांच्या तत्परतेने हा आहार परत करण्यात आला. या प्रकरणाची माहिती पालकांनी अंगणवाडी सेविकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रकार पुढे आला. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

आहारात बुरशी असल्याची तक्रार आल्याने अंगणवाडी केंद्रातून नमुने गोळा करून नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच नियमानुसार बचत गटांवर कार्यवाही करण्यात येईल असे, भंडाराचे नागरी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन मोहूरले, यांनी सांगितले.

तातडीने बोलावली मदतनीसांची सभा

महिला बाल विकास नागरी प्रकल्प अधिकारी नितीन मोहूरले यांनी सोमवारला पवनी येथे अंगणवाडी मदतनीसांची सभा बोलून आहाराची चव आणि स्वच्छतेबद्दलची शहनिशा केल्याशिवाय वाटप न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाटप झालेल्या निकृष्ट आहाराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.