भंडारा : भंडाऱ्यातील एक शिक्षक शाळेत जायला घरातून निघाले.पण ते शाळेत पोहोचलेच नाही. त्यानंतर जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ माजली. भंडारा येथील एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आणि जीवनाचा अखेर केला. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या या शिक्षकाने पहेला या गावाहून एक कीटकनाशकाची बॉटल घेतली त्यानंतर ते वाकेश्वर या गावी गेले आणि तिथून एक दोर विकत घेतला. गावातील काही लोकांनी त्यांना खरेदी करताना पाहिल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतीसाठी ते हे घेत असतील असे वाटल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. कायम हसत खेळत राहणारे आणि इतरांना आत्महत्येपासून परावृत्त करणारे हे शिक्षक अशा रीतीने आत्महत्येचे पाऊल उचलतील याचा कोणी विचारही केला नव्हता. झाडाला गळफास घेत या शिक्षकाने आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील चैतन्य विद्यालयातील शिक्षकाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृत शिक्षकाचे नाव रमेश शामराव पंचबुद्धे (४२) आहे. ते खुर्सीपार येथील रहिवासी आहेत. खुर्सीपारहून रावणवाडी कॅम्पसमार्गे मानेगावला ये – जा करत असत.
सोमवारी दररोजप्रमाणे ते मानेगावला जाण्यासाठी घरून निघाले. पण, शाळेत पोहोचले नाहीत. पंचबुद्धे यांनी सुट्टीचा अर्ज टाकलेला नव्हता. त्यामुळे शाळेतील काही शिक्षकांनी त्यांना फोनद्वारे संपर्क करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही अखेर या शिक्षकांनी त्यांच्या घरी फोन केला असता त्यांच्या पत्नीने ते सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाल्याचे सांगितले. या दरम्यान, दुपारी १२.३० वाजता वन विभागाचे कर्मचारी वन परिसरात गस्त घालत असताना त्यांना वारंवार त्या परिसरात फोनची रिंग वाजत असल्याचा आवाज येत होता. रिंगच्या दिशेने जात असतानाच रस्त्याच्या काही अंतरावर एक दुचाकी पार्क केलेली दिसली. वन कर्मचाऱ्यांनी वन परिसरात जाऊन पाहिले, तर त्यांना झाडावर त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. घटनेमुळे पंचबुद्ध कुटुंबाचे आणि चैतन्य विद्यालयातील शिक्षकांवर दुःखाचे सावट पसरले.
त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. रावणवाडी परिसराचा हा भाग अड्याळ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने अड्याळ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली आणि घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
एक मैत्रीपूर्ण शिक्षक म्हणून ओळखले जाणारे रमेश पंचबुद्धे यांनी असे पाऊल का उचलले, त्यांनी जीव देण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला, यामागील कारणांचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मात्र या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी पंचबुद्धे यांना एक फोन आला त्या फोनवर बोलल्यानंतर ते एकदम शांत झाले. त्यानंतर ते हरवल्यासारखे राहू लागले अशी माहिती आहे. हा फोन कुणाचा होता, फोनवर असे काय बोलणे झाले, फोनवर बोलल्यानंतर जे शिक्षकाने आत्महत्या करणे इतपत काय झाले याचा तपास पोलीस करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत. या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.