देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात तासिका प्राध्यापकांना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. जळगाव विभागाचे सहसंचालक ५० मिनिटांच्या तासिकेला ६२५ रुपये, तर नागपूर विभागातील सहसंचालक केवळ ५०० रुपये मानधन देत असल्याची माहिती आहे.
नियमित सेवा देऊनही तासिका प्राध्यापकांच्या वेतनाची देयके अनेक महिने रोखून ठेवणे, ४५ तासिकांऐवजी ३६ तासिकांचे वेतन देणे, ९ महिन्यांचा नियम असूनही सातच महिने काम देणे, अशा अनेक समस्यांना तासिका प्राध्यापक तोंड देत आहेत. हल्ली तासिका प्राध्यापकांवर उच्च शिक्षणाची धुरा असतानाही विभागीय सहसंचालक आणि उच्च शिक्षण संचालकांकडून तासिका प्राध्यापकांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे.
राज्याच्या अकृषी विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. अध्यापनापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून या रिक्त जागांवर तासिका प्राध्यापकाची तात्पुरती नेमणूक केली जाते. दरवर्षी राज्य सरकारकडे प्राध्यापकांच्या भरतीसाठी निधी नसल्याचे सांगून ही भरती १२ वर्षांपासून रखडत ठेवली आहे. ८० हजारांहून अधिक नेट, सेट, पीएच.डी. पदवीप्राप्त बेरोजगार तासिकांवर कशीबशी उपजीविका करत आहेत
दप्तरदिरंगाई, बाबूगिरीचा फटका
२०१८ मध्ये राज्य शासनाने मानधन ५०० रुपये केले, तर तत्कालीन शिक्षणमंत्री उदय सावंत यांनी पुढे यात १५० रुपयांची भर घातली. मात्र, यातही तासिका प्राध्यापक पूर्णत: भरडले गेल्याचा आरोप होत आहे. २०२१-२२ शैक्षणिक सत्रातील नियुक्ती ऑक्टोबरमध्ये झाली. त्यामुळे कुठल्याही तासिका प्राध्यापकाला ९ महिन्यांचा अध्यापन कालावधी मिळाला नाही. विद्यापीठ, महाविद्यालय आणि सहसंचालक कार्यालयातील दप्तरदिरंगाई व बाबूगिरीमुळे हे घडले, असा आरोप अंशकालीन प्राध्यापक संघटनेने केला आहे.
विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांतील तासिका प्राध्यापकांना वाढीव नियुक्त्या दिल्या नाहीत. प्रशासनातील भिन्न प्रवृत्तीमुळे विभागातील हजारो प्राध्यापकांवर अन्याय झाला आहे. याला वाचा फोडण्यासाठी सर्व प्राध्यापकांच्या संघटना एकत्रित लढा उभारणार आहेत.
– डॉ. प्रमोद लेंडे, अध्यक्ष, अंशकालीन प्राध्यापक संघटना
तासिका प्राध्यापकांवर कुठलाही अन्याय केला जात नाही. तास आणि तासिकांमधील फरक न कळाल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. एका तासासाठी ६२५ रुपये मानधन आहे. मात्र, त्याहून कमी वेळाची तासिका ठरवून दिल्यास मानधन कमी होते.
– डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण