अकोला : आधार सेवा केंद्र मिळवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. हे सेवा केंद्र प्रशासनाच्यावतीने महसूल मंडळांमध्ये दिले जाईल. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या सेवा केंद्राला मान्यता मिळवण्यासाठी काही अटी आहेत.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ३५ महसुली मंडळामध्ये ‘आधार सेवा केंद्र’ दिले जाणार आहे. त्यासाठी आपले सरकार केंद्र धारकांकडून अर्ज मागविण्यात आले. इच्छुक अर्जदारांनी संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करून तो १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावा लागेल.
जिल्ह्यातील महसूल मंडळ निहाय रिक्त असलेल्या केंद्राबाबत माहिती संकेतस्थळ जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आली. अर्जदारांकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रदान केलेले आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित असणे अनिवार्य आहे. आपले सरकार केंद्र चालक स्वतः ‘एनएसईआयटी सुपरवायझर’ परीक्षा उत्तीर्ण असावा, अर्जासोबत आधार, ‘एनएसईआयटी सुपरवायझर’ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
आधार संच व आधार केंद्र मंजूर झाल्यानंतर आवश्यक कीट महाआयटी यांच्यामार्फत मिळत असल्याने त्यांच्या निर्देशानुसार ५० हजार रुपयांची बँक हमी देणे आवश्यक राहील. अर्जदार जर पात्र ठरले तर अर्जानुसार त्याच महसुली मंडळामध्येच केंद्र सुरू करावे लागेल. आधार सेवा केंद्रासंदर्भात पात्र व अपात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार असल्याचे सांगण्यात आले.
वाशीम जिल्ह्यात १४ महसूल मंडळात नवीन केंद्र
वाशीम जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण १४ महसुल मंडळाच्या मुख्यालयी नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आपले सरकार सेतू सेवा केंद्र चालकांकडून अर्ज मागविण्यात आले. वाशीम तालुक्यातील राजगांव, पार्डी आसरा, मालेगाव तालुक्यातील चांडस, मेडशी, करंजी, रिसोड तालुक्यातील कवठा, मंगरुळपीर तालुक्यातील पोटी, पाथर्डी ताड, कवठळ, मानोरा तालुक्यातील गिरोली, कारंजा तालुक्यातील येवता, पोहा, उंबर्डा बाजार, कामरगांव अशा एकूण १४ महसुल मंडळांमध्ये नवीन केंद्र दिले जाईल. अर्ज स्वीकारण्याची मुदत ११ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. इच्छुकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, आधार शाखा वाशीम येथे प्रत्यक्ष ११ सप्टेंबर २०२५ रोजी सायं ४ वाजेपर्यंत सादर करावेत. ई-मेल किंवा पोस्टाने आलेले तसेच मुदतीनंतर प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. पात्र, अपात्र अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अटी व शर्तींसाठी आधार शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.