खासदार पटोलेंचे मत
बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळेच भाजपचा बिहारमध्ये पराभव झाला आणि एका गुन्ह्य़ात शिक्षा झालेल्या व मतदानाचा हक्कही नसलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाने विजय मिळवला, असे परखड मत खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. शहरात रविवारी व्ही.पी.सिंग सामाजिक विचार मंचतर्फे ‘मंडल आयोग निर्णयाची २५ वर्षे’ या विषयावर आयोजित ओबीसी कार्यकर्ता परिषदेत ते बोलत होते.
पटोले म्हणाले, ओबीसी समाज हक्क आणि अधिकाराप्रती जनजागृतीची व ओबीसी शिष्यवृत्तीनंतर आता स्वतंत्र मंत्रालयासाठी ओबीसींनी लढायला सज्ज होण्याची गरज आहे. बिहारात ओबीसींनी आरक्षणाच्या मुद्यावर आलेल्या एका वक्तव्यावरून लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिले. त्यावरून ओबीसींची ताकद दिसून येते.