भांडेवाडी येथे प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राम भाकरे, नागपूर</strong>

कचऱ्यापासून बायोऑईल, मिथेन आणि बायोचरची निर्मिती केली जाणार आहे. भांडेवाडी येथे एक एकर जागेवर दररोज ५ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

शहरातील विविध भागातून दररोज १२०० टन कचरा गोळा होतो. या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. आता बायोऑईल, मिथेन आणि बायोचरची निर्मितीही केली जाणार आहे. महापालिकेच्या विशेष सभेत या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून एका खासगी संस्थेच्या माध्यमातून तो राबवला जाणार आहे. भांडेवाडी येथील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत नागपूर शहरात निर्माण होत असलेल्या घनकचऱ्यापैकी सध्या ५ मेट्रिक टन  घनकचऱ्यावर गतीने पायरोरलिसिस करून त्यातून बायोऑईल, मिथेन व बायोचर इत्यादी व्यावसायिक आणि पर्यावरण मूल्य दृष्टीने महत्त्वाचे मूल्य असणाऱ्या वस्तू तयार करून त्यात कचऱ्यांची  विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने महापालिकेने हा प्रयोग हाती घेतला आहे.

या प्रकल्पाबाबत बोलताना नीलेश दाऊतखानी म्हणाले, शहरातील ओला व सुका कचऱ्याची विल्हेवाट आज वेगवेगळ्या पद्धतीने लावली जात असली तरी कचऱ्याच्या पायरोलिसीस या प्रकल्पातून मात्र रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यातून निघणाऱ्या मिथेनचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल. नीरीने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यासाठी मोठी मशीन घेण्यात आली आहे. भांडेवाडीमध्ये एक एकर परिसरात याची सुरुवात केली जाणार आहे. यात ओला व सुका कचरा जाळू शकतो. ५२५ ते ५८० डिग्री से. तापमानावर हा कचरा सुरुवातीला जाळला जाणार आहे. त्यात मग पाणी टाकले जाईल. त्यातून  कार्बन तयार होऊन  त्यानंतर  बायोचर, बायोगॅस (मिथेन) आणि फरनेस ऑईल निघेल. ही प्रक्रिया सुरुवातीला अर्धा तास इलेक्ट्रिकवर चालणार आणि त्यानंतर मिथेनवर ती राबवली जाणार आहे. शहरातील दररोज निघणाऱ्या १२०० टनावर ही प्रक्रिया करता येते आणि त्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र, प्रारंभी ५ टनावर ही पक्रिया केली जाणार आहे. या ५ टनापासून साधारणत: २७ ते ३० मिथेन, बायोऑईल (फरनेस ऑईल) आणि बायोचर निघेल.

इंदौर शहरात हा प्रयोग राबवण्यात आला. आता तो आपल्याही शहरात राबवला जाणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर असेल. त्यात जर यश आले तर पुढे संबंधित खासगी कंपनीला जास्तीत जास्त कचरा उपलब्ध करून दिला जाईल. कचऱ्याचे विलगीकरण करताना त्याचा उपयोग शेतकऱ्यांना व नागरिकांना व्हावा, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

– दिलीप कांबळे, महापालिका आरोग्य अधिकारी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bio oil methane and biochar will be produced from waste
First published on: 08-02-2019 at 02:30 IST