पावसाचा अंदाज देणारी हवामानविषयक सरकारी आणि खासगी यंत्रणा अपयशी ठरू शकते, पण पक्ष्यांच्या गमन-आगमनावरून बांधले जाणारे अंदाज शंभर टक्के खरे ठरतात. पाऊस आणि पक्षी यांचे नाते अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी गेल्या पावसाळयात ‘लोकसत्ता’जवळ उलगडले होते. यावर्षी मान्सूनच्या गमन आगमनाचा जो घोळ हवामान खाते आणि स्कायमॅट या दोन्ही यंत्रणांनी घातला, त्यानंतर चितमपल्ली यांचे म्हणणे किती योग्य आहे, याचा प्रत्यय येत आहे.
पावसाच्या अंदाजाबाबत यंदा प्रथमच सरकारी व खासगी यंत्रणेचा सूर जुळला, पण सूर जुळला असला तरी अंदाज निश्चितच चुकला. पूर्वीच्या काळात हवामान खाते कोळयांना विचारून मान्सूनचा अंदाज बांधत होते. आता मान्सूनचा अंदाज मोसमी वाऱ्यांच्या दिशेवरून ठरवला जातो, पण तो ही खरा ठरत नाही. कारण केरळमध्ये कुठेतरी मान्सून कोसळला म्हणून मान्सूनच्या आगमनापूर्वीच मान्सून घोषित करण्याची घाई हवामान खात्याला झालेली असते. त्यापेक्षा पारंपरिक आडाख्यावरून बांधला जाणारा मान्सूनचा अंदाज खरा ठरतो. मग ते कोळ्याचे समुद्रात टाकले जाणारे जाळे असो, वा ‘पेरते व्हा’ म्हणून ओरडणारा ‘पावश्या’ पक्षी असो! वास्तविक या पारंपरिक आडाख्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, तरीही हे पारंपरिक अंदाज शंभर टक्के खरे ठरतात.
मान्सूनची नांदी देणारा पक्षी हा त्यातला महत्त्वाचा घटक! पावसाळयाच्या सुरुवातीला होणारे पक्ष्यांचे स्थलांतरण मान्सूनची नांदी देऊन जाते. कारण कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबतच पक्षीसुद्धा दक्षिण-उत्तर असा प्रवास करतात. मान्सूनच्या आगमनाची सर्वात मोठी खूण म्हणजे ‘पावश्या’ पक्षी! पावश्या आणि पाऊस याचे नाते अतूट आहे. म्हणूनच कदाचित त्याचे नावही पावश्या पडले असावे. तो येतानाच पावसाची वर्दी घेऊन येतो म्हणून शेतकरीसुद्धा ‘तो’ कुठे दिसतो का, याकडे लक्ष ठेवून असतात. ‘पेरते व्हा, पेरते व्हा.’ असा आवाज तो करतो. हे ऐकण्यासाठी शेतकरीसुद्धा आतूर असतो. कारण त्याचा अंदाज कधीच खोटा ठरत नाही. हवामान खात्यावरून पेरणीचे आराखडे बांधणाऱ्या शेतकऱ्याला यावर्षीसुद्धा नुकसानच सहन करावे लागले. पावश्याप्रमाणेच आफ्रिकेतून स्थलांतर करीत भारतात येणारा ‘चातक’सुद्धा ‘पिक पिक’ असा आवाज करत पावसाच्या आगमनाचे संकेत देतो. चातकाचे आगमन झाले की पावसाचेही आगमन होते.
पावसाच्या आगमनापूर्वी रोहीत किंवा समुद्री राघू, फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होऊ लागते. एकेका थव्यात हजारोंच्या संख्येत ते असतात. सागरकिनारी आणि गोडय़ा पाण्याच्या जलाशयावरही ते जमतात. नवरंग पक्ष्याचे आगमनसुद्धा पावसाळयातच होते. ‘व्हीट टय़ू, व्हीट टय़ू.’ असा आवाज करत ते येतात. पावसाच्या आगमनाची नांदी देणारा आणखी एक पक्षी म्हणजे राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा मिळालेला मोर. पावसाच्या आगमनादरम्यान जंगलातील मोरनाचीत शेकडो मोर आणि लांडोर एकत्र येऊन नृत्य करतात. कोकणच्या किनाऱ्यावर वादळी पाखरु येऊन पावसाच्या आगमनाची सूचना देतो. या पक्ष्यांचे थवे समुद्रावरून किनाऱ्यावर आले की पावसाची सूचना मिळते. पावसाचे आगमन कधी होईल, तो कधी थांबेल या दोन्हीचा अंदाज हवामानतज्ज्ञ देऊ शकत नाही, पण पक्ष्यांच्या गमन आगमनावरून पावसाचे अंदाज मात्र तंतोतंत खरे ठरतात.
पक्ष्यांची घरटी बनविण्यासाठी चाललेली धडपड हा आणखी एक मान्सूनच्या नांदीचा सूचक! सुगरण, शिंपी, टिटवी, कोतवाल, वेडा राघू, सुतार, राखी धनेश अशा अनेक पक्ष्यांचा हा विणीचा काळ! या पक्ष्यांची घरटी बनविण्यासाठी धडपट सुरू झाली की मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळतात. कधी जोडीदारासोबत तर कधी एकटेच ते घरटी तयार करतात.
या पावसाळी पक्ष्यांची अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी सांगितलेली गंमतही मोठी मजेशीर आहे. कोकीळ, पावश्या आणि चातक हे पक्षी कावळा आणि सातभाई या पक्ष्यांच्या घरटय़ात अंडी घालतात. अंडय़ातून पिले बाहेर आल्यानंतर कावळे आणि सातभाई पक्षी त्या पिलांची जोपासना करतात. पावसाच्या आगमनापूर्वीच्या आणि पावसाचा अंदाज देणाऱ्या पक्ष्यांच्या या हालचाली आता शहरात पाहायला मिळत नाही.