अकोला : माजी खासदार तथा भाजप नेते अनंतराव देशमुख यांच्या सुविदे फाउंडेशनच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी रिसोड तालुक्यातील करडा येथील २१.८५ हेक्टर जमिनीच्या भाडेपट्ट्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. यासाठी एक रुपया नाममात्र दर आकारला जाईल. विधानसभा निवडणुकीत अनंतराव देशमुख यांनी महायुतीविरोधात बंडखोरी केली होती. या प्रकरणात भाजपने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती. आता त्यांच्या संस्थेच्या जमीन भाडेपट्ट्याचे नाममात्र दरात नुतनीकरण केल्याने हे महायुती विरोधातील बंडखोरीचे ‘गिफ्ट’ तर नव्हे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या निमित्ताने भाजपने शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचले आहे.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील सुविदे फाउंडेश यांना मौजे करडा येथील २१.८५ हे. आर जमीन भाडेपट्ट्याचे नाममात्र दराने (एक रुपया) पुढील ३० वर्षांसाठी नुतनीकरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. माजी खासदार, माजी राज्यमंत्री तथा भाजप नेते अनंतराव देशमुख या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सुविदे फाउंडेशद्वारे करडा येथे कृषी विज्ञान केंद्र संचालित केले जाते. या केंद्रासाठी सुविदे फाउंडेशनला २१.८५ हे. आर जमीन भाडेपट्ट्यावर अगोदरच देण्यात आली होती. त्याचा कालावधी संपुष्टात येत असल्याने आज मंत्रिमंडळाने भाडेपट्ट्याचे नुतनीकरण केले. विशेष म्हणजे नाममात्र एक रुपया दरानेच शासनाने ही जमीन दिली. अनंतराव देशमुख यांच्या संस्थेच्या जमिनीचा भाडेपट्टा सत्ताधाऱ्यांनी वाढवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.
भाजपकडून रिेसाेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अनंतराव देशमुख इच्छूक होते. उमेदवारीसाठी विधानसभा निवडणुकीच्या दीड वर्षांपूर्वी ते भाजपवासी झाले. मात्र, महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटासाठी सुटली. त्यांनी आ.भावना गवळी यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे नाराज झालेल्या अनंतराव देशमुख यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा हाती घेतला. या अगोदर काँग्रेसमध्ये असतांनाही त्यांनी बंडखोरी केली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष अनंतराव देशमुख, काँग्रेसचे अमित झनक यांच्यामध्येच लढत झाली, तर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळी तिसऱ्या स्थानावर घसरल्या. रिसोडमध्ये महायुतीत कुरबुरी होती. अनंतराव देशमुखांना भाजपचे छुपे पाठबळ असल्याचा आरोप देखील शिवसेना शिंदे गटाकडून झाला. विशेष म्हणजे महायुतीविरोधात बंडखोरी करून देखील भाजपने अनंतराव देशमुख यांच्यावर कुठलीही कारवाई केली नव्हती. आता या सर्व घडामोडींना वर्ष उलटून गेल्यानंतर अनंतराव देशमुख यांच्या संस्थेच्या जमीन भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या निर्णयामुळे अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुविदे फाउंडेशनच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी रिसोड तालुक्यातील करडा येथील २१.८५ हेक्टर जमीन ३० वर्ष अगोदरपासूनच शासनाने दिली आहे. मंत्रिमंडळाने त्याच्या नुतनीकरणाचा आज निर्णय घेतला. मी भाजपमध्येच कार्यरत असून आगामी निवडणुकीत पक्षाचेच जोमाने काम करणार आहे. – अनंतराव देशमुख, माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री, वाशीम.
