नागपूर : भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. ही निवडणूक आणि मतदान दिल्लीत होणार आहे. मग, भाजप आतापासूनच फडणवीस यांच्यावर जबाबदारी का देत आहेत. त्यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी आहे का, असा खोचक सवाल काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून कारवाई करायची, लोकांना तुरुंगात टाकायचे, असे मोदी सरकारचे धोरण राहिले आहे. यासंदर्भात अनेक वेळेला न्यायालयाने फटकारले आहे, तरीही एजन्सीचा दुरुपयोग केला जात आहे. आता ३० दिवस तुरुंगात टाकायचे आणि सरकार पाडून टाकायचे, असे यांचे नियोजन आहे, असे पटोले म्हणाले.

निवडणूक विश्लेषक आणि लोकनीती-सीएसडीएसचे (सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) समन्वयक संजयकुमार यांनी जुने ट्विट डिलिट करून माफी मागितली. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चुकीची माहिती ट्विट टाकल्याप्रकरणी गुन्हा होत असेल तर निवडणूक आयोगानेसुद्धा चुकीचे ट्विट केले आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दखल झाले पाहिजे, असे अशी मागणी नाना पटोले यांनी येथे केली.

संजय कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याही विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजेत. संजय कुमार यांनी आपल्या डिलीट केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्रातील रामटेक विधानसभा मतदारसंघ क्रमांक ५९ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान ४,६६,२०३ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या २,८६,९३१ वर आली, म्हणजेच ३८ टक्के मतदार कमी झाले. तसेच, देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ४,५६,०७२ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीत ही संख्या २,८८,१४१ इतकी झाली. म्हणजेच ३६ टक्के मतदार कमी झाले. या आकडेवारीचा आधार घेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीत गडबड झाल्याचा आरोप केला होता.

नाना नेमके काय म्हणाले?

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे. ही निवडणूक आणि मतदान दिल्लीत होणार आहे. मग, आतापासून फडणवीस यांच्यावर जबाबदारी का देत आहेत. त्यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी आहे का, असे पटोले म्हणाले