अमरावती : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आजच्या घडीला संख्याबळाच्या दृष्टीने भाजप देशासह राज्यात सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपने मंडळ अध्यक्षांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मंडळ अध्यक्षांनी भाजपला प्रत्येक गट आणि गणात आघाडीवर ठेवण्याचा निर्धार करावा, आपल्या भागातील पक्षविस्ताराची जबाबदारी घेऊन दौरे करावेत, समाजातील सर्वच स्तरांतील कार्यकर्त्यांचा समावेश करावा, असा संदेश मंडळ अध्यक्षांना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनेही ब्लॉक अध्यक्षांना बळ देण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यास प्राधान्य दिले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने ७ आणि ८ ऑगस्ट रोजी मुंबईतील दादर येथील पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे शिबीर आयोजित केले आहे. हे दोन दिवसीय निवासी शिबीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. ४ जून २०२५ व २६ जून २०२५ रोजी निवड समितीसमोर मुलाखती घेऊन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

आता राज्यातील सर्वच ५५३ ब्लॅाक अध्यक्षांचे शिबिर घेण्याचे प्रदेशाध्यक्षांनी ठरविले असून पहिल्या टप्प्यात नवनियुक्त ब्लॅाक अध्यक्षांचे शिबीर पार पडणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने सर्वांचे शिबीर होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी सकाळी या शिबिराची सुरुवात होणार असून दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शिबिराची सांगता होणार आहे. काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात पोहचवणे, पक्ष संघटन मजबूत करणे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राज्यातील विविध सामाजिक, राजकीय मुद्यांवर या शिबिरात ऊहापोह केला जाणार आहे. नेते व विविध क्षेत्रातील वक्ते या शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात अनेक विषयांवर चिंतन आणि मंथन अपेक्षित आहे.

दुसरीकडे, काँग्रेसला लागलेली गळती रोखण्यासोबतच गटबाजीचे ग्रहण दूर करण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेतृत्वासमोर आहे. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांपुर्वी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जागा भरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बूथ यंत्रणा सक्षमीकरणावर काँग्रेसचे विशेष लक्ष असणार आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीनंतर अनेक ठिकाणी नाराजीनाट्य घडून आले. याचा विपरित परिणाम पक्षसंघटनात्मक बांधणीवर होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन ब्लॉक अध्यक्षांना करण्यात आले आहे.