चंद्रपूर : भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री स्व. गंगूबाई जोरगेवार (अम्मा) टोपल्या विक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या स्थळाचे ‘अम्मा चौक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर पदपाथ दुकानदार संघटनेने केली. त्यानंतर महापालिकेने चौकाच्या नामकरण व सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली. मात्र, काँग्रेसच्या आक्षेपानंतर ही जागा पुरातत्त्व विभागाच्या मंदिरालगत असल्याचा साक्षात्कार झाला आणि महापालिका आयुक्तांनी तत्काळ बांधकाम बंद केले. ऐतिहासिक गांधी चौकापासून शंभर मीटर अंतरावरच ‘अम्मा चौक’ होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शहर पोलीस ठाण्याला लागून असलेल्या पदपथावर आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री टोपल्या विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. जोरगेवार आमदार झाल्यानंतरही त्यांचा व्यवसाय सुरूच होता. आईच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्या, यासाठी जोरगेवार यांनी विविध सामाजिक उपक्रम सुरू केले. ‘अम्मा का टिफीन’, ‘अम्मा की पढ़ाई’, ‘अम्मा की दुकान’, आदींचा त्यात समावेश आहे.

इथवर सर्व ठीक होते, मात्र आता जोरगेवार यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावे ‘अम्मा चौक’ तयार करण्याचा आणि तेथेच पुतळा बसवण्याचा आग्रह काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून धरला. महापालिकेने स्थायी समितीत ‘अम्मा चौक’ निर्मितीचा ठरावही पारित केला. ‘अम्मा’ यांचा नियोजित पुतळा आणि गांधीजींचा पुतळा यांच्यातील अंतर शंभर मीटरपेक्षाही कमी आहे. या जागी पुतळा नव्हे, तर शिल्पचित्र तयार केले जाणार होते, असे महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांचे म्हणणे आहे.

परंतु, बांधकामाची रचना पाहता तिथे अर्धकृती पुतळा बसवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट दिसते. या बांधकामाची संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाली. काहींनी ही बाब काँग्रेस शहराध्यक्ष रामू ऊर्फ रितेश तिवारी यांच्या निदर्शनास आणून दिली. तिवारी यांच्या नेतृत्वात माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर, प्रवीण पडवेकर, महिला काँग्रेस अध्यक्ष वैरागडे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पालिवाल यांची भेट घेत, या बांधकामाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. ज्या जागेवर हे बांधकाम सुरू आहे, ती पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येते, असे तिवारी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महापालिकेने बांधकाम तात्पुरते थांबवले.