महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन नेत्यांमधील वाद रंगण्याची चिन्हे
जगनाडे चौकातील वादग्रस्त असलेल्या ट्रान्सपोर्ट प्लाझाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर अनियमिततेचे कारण देऊन नागपूर सुधार प्रन्यासने तेथील बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले. या प्लाझाच्या बांधकामावरून भाजपच्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला असून पक्षातील वरिष्ठापर्यंत हा वाद पोहोचला असल्यामुळे ते याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. प्लाझाच्या बांधकामावरून भाजपमधील दोन नेत्यांचा वाद हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.
पूर्व नागपुरात जगनाडे चौकात उभारण्यात येत असलेल्या ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या कामाबाबत सुरुवातीपासून संबंधित कंत्राटदाराच्या कामासंदर्भात आरोप केले जात आहेत. भाजपमधून प्रशासनावर दबाव आणल्या जात असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराबाबत कुठलीच कारवाई केली जात नव्हती. भाजपचे नगरसेवक आणि नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त असलेल्या डॉ. रवींद्र भोयर यांचा ट्रान्सपोर्ट प्लाझामध्ये (पार्टनर) सहभाग असल्यामुळे २०१२-१३ या काळात या या प्लाझाच्या संदर्भात ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या त्यांनी दूर केल्या होत्या. २०१३ मध्ये त्याचे बांधकाम सुरू केले होते. गेल्या दोन-अडीच वर्षांत या ट्रान्सपोर्ट प्लाझाचे काम सुरू असताना त्यात मोठय़ा प्रमाणात अनियमितता आढळून आली. मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास खात्याच्या अखत्यारीत येत असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या शहरातील ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला.
जगनाडे चौकातील ‘नासुप्र’च्या जागेवर सुरू असलेल्या ट्रान्सपोर्ट प्लाझाचे काम मंजूर आराखडय़ानुसार का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. ‘नासुप्र’ची परवानगी न घेता कंत्राटदाराने त्या ठिकाणी गाळे बांधून त्यांची विक्री सुरू केली. संत जगनाडे महाराज स्मारक समितीला शासनाने दिलेला ८ हजार चौरस फुटांचा ‘एफएसआय’ इतर कामाकरिता वापरण्यात आला आहे. प्रन्यासच्या हनुमाननगर झोनने यावर आक्षेप घेऊन संबंधितांना नोटीस बजावल्या. मात्र, कंत्राटदाराने त्याची दखल घेतली नाही.
यापूर्वी २७ एप्रिल २०१६ ला कंत्राटदारावर कारवाई करण्यासंदर्भात खोपडे यांनी प्रन्यासला पत्र दिले होते. आमदार सुधाकर देशमुख यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर संबंधित मंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, त्यावर दबावामुळे कोणतीही कारवाई केली जात नव्हती. खोपडे यांच्या पत्रावर नुकतीच नासुप्रच्या सभापतींनी तेथील बांधकाम थांबविण्याचे आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर डॉ. भोयर यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन त्यांना याबाबत मध्यस्थी करण्याची
विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकीकडे खोपडे यांनी या प्लाझाच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली असताना दुसरीकडे मात्र डॉ. भोयर यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.