|| सौरभ कुलश्रेष्ठ

भास्कर जाधव-आशीष शेलारांमुळे सदनात अनर्थ टळला :- राजकीय सुसंस्कृतपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत मंगळवारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. शेतकऱ्यांना मदतीसाठीचा फलक भाजपच्या आमदारांनी झळकावल्यानंतर तो शिवसेना आमदारांनी ओढल्याने या धक्काबुक्कीचे रूपांतर हाणामारीत होण्याची चिन्हे होती. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आणि भाजपचे आशीष शेलार यांनी वेळीच हस्तक्षेप करत आमदारांना रोखल्याने अनर्थ टळला.

मंगळवारी दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज सुरू होताच सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदतीबाबत चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.  यावर अध्यक्ष नाना पटोले यांनी त्याबाबत प्रश्न विचारल्यावर भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही आमदारांनी शिवसेनेचे मुखपत्रातील शेतकरी मदतीबाबतच्या बातमीचा फलक झळकावला. त्यावर आक्षेप घेत पटोले यांनी त्यांची नावे नोंदवण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. त्या गोंधळात अर्थमंत्री जयंत पाटील बोलायला उभे राहिले. भाजपचे आमदार फलक घेऊन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळ गेले. त्यावेळी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी तो ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून भाजपचे आमदार हरिश पिंपळे, सेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. दोन्ही पक्षांचे आमदार एकमेकांच्या अंगावर चाल करून हाणामारी करणार इतक्यात शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मध्यस्थी करत आमदारांना दूर केले. भाजपचे आशीष शेलार यांनीही मध्यस्थी केली. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपचे गिरीश महाजन यांनीही आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

आरोप-प्रत्यारोप

नागपूरचे हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसांचे असून कामकाजाचा वेळ कमी आहे. या काळात शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सुटावे म्हणून सभागृहात चर्चा महत्त्वाची आहे. परंतु विरोधक चर्चा होऊ देत नाहीत. पहिल्या दिवसापासून त्यांनी गोंधळ घालणे सुरू केले. चर्चेशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. मंगळवारी अर्थमंत्री जयंत पाटील सभागृहाला माहिती देत होते. परंतु, भाजपचे आमदार मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांसमोर फलक झळकवत होते. शेवटी मंत्र्यांच्या संरक्षणासाठी आम्ही पुढे आलो आणि फलक ओढला असा दावा शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. तर फलकाच्या माध्यमातून शेतकरी मदतीसाठी सरकारचे सभागृहात आम्ही लक्ष वेधत होतो. त्यावेळी शिवसेना आमदारांनी फलक हिसकवण्याचा प्रयत्न केला, असे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षांची नाराजी

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात घडलेला प्रकार अशोभनीय असल्याची नाराजी व्यक्त केली. ही दुर्दैवी घटना आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी भूमिका जरूर मांडावी पण अशा रीतीने वागता कामा नये. सत्ताधारी आमदारांनीही हे लक्षात घेतले पाहिजे. यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी समज पटोले यांनी दोन्ही बाजूच्या संबंधित आमदारांना दिली.  त्यावर विरोधी पक्षाचे आमदार यापुढे संयमाने वागतील, अंगावर जाणार नाहीत याची खात्री देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.  त्यानंतर चर्चा घेण्यास नाना पटोले यांनी नकार दिल्यानंतर भाजप आमदारांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळातच चार विधेयके मंजूर करण्यात आली.