प्रसंग एक- काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात उमेदवार निवडीसाठी पक्षाचे राज्य प्रमुख व उपराजधानीतील वरिष्ठ नेते एकत्र आले आहेत. या नेत्यांमधील तीव्र मतभेदांमुळे वातावरण तापले आहे. शेवटी त्याचा स्फोट होतो आणि एक नेता राज्य प्रमुखाला उपराजधानीत ‘सलामी’ देण्याची भाषा करत बैठकीतून बाहेर पडतो. जमलेले सारे अगदी अवाक् होऊन हा प्रकार बघत असतात.
प्रसंग दोन- पक्षाचे उमेदवार निवडण्यासाठी भाजपचे सर्व नेते नितीन गडकरी यांच्या वाडय़ावर एकत्र आले आहेत. थोडय़ा वेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होते. मग शांतपणे एकेक इच्छुकाच्या सकारात्मक व नकारात्मक बाबीवर चर्चा सुरू होते. एकमत होताना दिसले नाही की, नाव बाजूला पडत जाते. सर्व उमेदवार ठरल्यावर गडकरी व फडणवीसांच्या लक्षात येते की, आपण ठरवलेली काही नावे बाद यादीत गेली आहे. त्यांना समजावू, असे सांगत हे नेते मनाचा मोठेपणा दाखवतात व कुठल्याही वादाविना उमेदवारांची यादी अंतिम होते.
भाजप का जिंकला आणि काँग्रस का हरली, या प्रश्नांची उत्तरे या दोन प्रसंगात सामावलेली आहेत. वाद कोणत्याही पक्षात असतात. ते असायलाच हवे, पण या वादांना कुठे उगाळायचे व कुठे नाही, हे भाजपला जास्त कळते व काँग्रेसला कळूनही उमगत नाही. भाजपने उपराजधानीत, तसेच विदर्भात नुकतेच जे यश मिळवले त्याचे सार या व्यवहारचतूर राजकारणात दडले आहे. सामान्य जनतेचा पक्षावरचा विश्वास अजूनही ढळलेला नाही. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर लोकांची नाराजी राहू शकते, हे चाणाक्षपणे हेरून फडणवीस व गडकरींनी उपराजधानीत स्वत:साठी मते मागितली. ही निवडणूक जणू हे दोन नेतेच लढवत आहेत, असा आभास निर्माण केला गेला. या शहराचा विकास केला गेला नाही, तर तोंड दाखवणार नाही, हे फडणवीसांचे वक्तव्य याच आभासाला बळ देणारे होते. गडकरी एरवी साऱ्यांना वाडय़ावर बोलावतात, पण यावेळी नाराजांची समजूत घालण्यासाठी ते स्वत: फिरले. अनेक वस्त्या व बोळांमध्ये जाताना त्यांना रोषाला तोंड द्यावे लागले, तरीही ते डगमगले नाहीत. कार्यकर्त्यांनी वाडय़ावर जो गोंधळ घातला तो निस्तारण्यासाठी बावनकुळेंना अनेकांना हात जोडावे लागले. या साऱ्या गोष्टीतून या नेत्यांविषयी जनतेत जो सकारात्मक संदेश गेला त्याचा फायदा भाजपला मिळाला. महापालिकेची आर्थिक अवस्था खराब आहे. त्यामुळे पालिकेच्या कामगिरीच्या बळावर निवडणूक जिंकणे शक्य नाही, हे गडकरी व फडणवीस यांच्या ध्यानात येताच त्यांनी केंद्र व राज्याचा निधी आणला व त्यातून विकासकामे सुरू केली. निवडणुकीच्या काळात ही कामे जनतेला दिसत होती. या नेत्यांनी प्रचाराचा सारा भर विकास या मुद्यावरच केंद्रित केला होता. नेमकी हीच बाब या पक्षाच्या पथ्यावर पडली. हे केवळ नागपुरात झाले, असे नाही. चंद्रपुरात मुनगंटीवार व अहिरांनी तेच केले. या दोघांनी ग्रामीण भागासाठी भरपूर निधी मंजूर केला.
वर्धा व चंद्रपूर शहरात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या रोषाला न जुमानता अनेक विकासकामे बांधकाम खात्याकडून करून घेतली व पालिकेत सक्रिय असणाऱ्या भ्रष्टाचारी वर्तुळाला ठेंगा दाखवला. अमरावतीत तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च लक्ष घातले होते. तेथील वस्त्रोद्योग गुंतवणूक, त्याचा झालेला प्रचार कामात आला. एरवी सरकारकडून कायम उपेक्षा पदरी पडणाऱ्या वैदर्भीय जनतेसाठी हा बदल सुखावणारा होता. हे सरकार आपले आहे, असे चित्र जनतेच्या मनात निर्माण करण्यात भाजपला यश आले. त्याचा फायदा या पक्षाला मिळाला.
या निवडणुकीत विरोधक सबळ नाहीत, जे आहेत ते केवळ तोंडाची वाफ दवडणारे आहेत. माध्यमांच्या पलीकडे त्यांना किंमत नाही व जनतेत विश्वासाचे स्थान नाही, याची जाणीव भाजपच्या या नेत्यांना होती. तरीही गाफील राहण्याचा फालतूपणा या पक्षातील एकाही नेत्याने केला नाही. विदर्भ म्हणजे भाजप, हे समीकरण जवळ जवळ रूढ झाल्याचे प्रत्येक निवडणुकीत दिसून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विदर्भातही अनेक प्रचारसभा घेतल्या. केवळ तेच नाही, तर या पक्षाचे इतर मंत्री सुद्धा सर्वत्र सभा घेत फिरले. आज मुख्यमंत्रीपदी फडणवीस असताना त्यांचे वडील दिवं. गंगाधरराव आमचे सहकारी होते, असे सांगत मत मागणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना जनता जवळ करणार नाही, हे ठाऊक असून सुद्धा भाजप नेत्यांनी प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. सत्ता आली की, पक्षातील अनेकांना महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागतात. त्यातून अंतर्गत धुसफूस होऊ लागते व त्याचे पर्यवसान अनेकदा बंडखोरीत होते. १९९५ चा हा अनुभव लक्षात घेऊन भाजपने यावेळी आरंभापासूनच नाकेबंदी केली, त्यामुळे हे धुमारे फुटू शकले नाहीत. याच्या अगदी विपरीत स्थिती प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेसमध्ये होती. सत्ता असो अथवा नसो, बंडखोरीचे रक्त या पक्षनेत्यांच्या नसानसात भिनलेले आहे. त्याचा प्रत्यय या निवडणुकीत येत असताना भाजपचा तंबू बराच शांत राहिला. काही कार्यकर्त्यांनी बंडखोरीचा आव आणला, पण जनतेचा भाजपवर असलेल्या विश्वासाला तडा देण्यात ते यशस्वी ठरले नाहीत. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला अंगावर घेतले होते. मात्र, विदर्भात सेनेच्या वाघांचा जोर केवळ कागदावर आहे. मैदानात हा वाघ साधे गवतही खाऊ शकणार नाही, याची भाजपला खात्री होती आणि नेमके घडलेही तसेच. विरोधक म्हणून प्रभावी कामगिरी करत सत्ता मिळवणे आणि सत्तेचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवत निवडणुका जिंकणे, या दोन्ही गोष्टीत खूप फरक आहे. भाजप या दोन्ही डावपेचात पारंगत असल्याचे विदर्भातील निकालांनी सिद्ध केले. उपराजधानीत मिळालेले नेत्रदीपक यश, अनेक जिल्हा परिषदांमध्ये हाती आलेला सत्तेचा सोपान, हे सारे सुखावणारे असले तरीही सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान या यशाने भाजपसमोर उभे केले आहे. भविष्यातील ही वाटचाल हा पक्ष कसा करतो, यावरच या पक्षाच्या यशाच्या सूत्राचा पुढचा मार्ग अवलंबून राहणार आहे. उपराजधानी व विदर्भातील या निकालाने विरोधक कसा असावा, याची शिकवणी लावण्याची वेळ भाजपने काँग्रेस नेत्यांवर आणली आहे, हे मात्र खरे!
devendra.gawande@expressindia.com