वर्धा : जिल्ह्यातील सहाही पालिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करण्यात अखेर भाजपने बाजी मारली आहे. देवळी वगळता उर्वरित पाच पालिकेत भाजप आमदार यांनी टाकलेला शब्द अखेरचा ठरला. जिल्हा निवडणूक समिती अध्यक्ष असलेले माजी खासदार यांचा शब्द देवळीत फायनल झाला. हिंगणघाट, वर्धा व आर्वीत भाजप आमदारांचे विश्वासू उमेदवारी घेण्यात यशस्वी ठरले आहेत. आर्वीत आमदार दादाराव केचे आपल्या सुनेस उमेदवारी मिळवण्यात अयशस्वी ठरले आहे. जातीय निकषावर सहा पैकी चार तेली समाजाचे, एक कुणबी तर एक ब्राम्हण समाजाचा उमेदवार भाजपने दिल्याचे चित्र पुढे आले आहे.

वर्ध्यात पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांचे दोन तपाचे विश्वासू व भाजप शहराध्यक्ष नीलेश किटे यांना उमेदवारी मिळाली आहे. देवळीत माजी नगराध्यक्ष शोभाताई रामदास तडस या लढतील. आर्वीत स्वाती गुल्हाने यांना उमेदवारी मिळाली आहे. हिंगणघाट येथे नयना तुळसकर या उमेदवार ठरल्या. पुलगाव येथे ममता बडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सिंदी रेल्वे पालिकेसाठी भाजपने राणी कळोडे यांना उमेदवारी दिली आहे.

वर्ध्यात सगळ्यात अधिक चूरस होती. पण पालकमंत्री भोयर हे किटे यांच्या नावासाठी प्रतिष्ठा पणास लावतील असे म्हटल्या जात होते. तसेच तेली समाजास उमेदवारी देण्याची बाब पुढे आली होती. तेव्हा वर्ध्यातच कां, जिल्हा हा निकष ठेवून जातीय समीकरण मांडा. इतर ठिकाणी पण कुणबी व तेली हा निकष ठेवून उमेदवारी देणार कां, असा युक्तीवाद झाला. तेव्हा वर्ध्यात कुणबी व अन्यत्र तेली समाजास सामावून घेण्यावर एकमत झाले. यात माजी खासदार व निवडणूक समिती अध्यक्ष रामदास तडस यांनी कळीची भूमिका पार पाडल्याचे सांगण्यात आले. आर्वीत शेवटपर्यंत आमदार दादाराव केचे यांनी सुनेसाठी जिद्दीने प्रयत्न केले.

पण आमदार सुमित वानखेडे यांचाच प्रभाव पुन्हा दिसून आला. आता केचे काय करणार, हाच प्रश्न सर्वाधिक चर्चेत आहे. हिंगणघाट येथे अल्पसंख्यांक समाजातील आमदार असतांना पुन्हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अल्पसंख्यांक कसा, असा युक्तीवाद पक्षीय पातळीवार करण्यात आला. त्यामुळे अन्य म्हणून आमदार समीर कुणावार यांचे विश्वासू असलेल्या तुळसकर कुटुंबास उमेदवारी देण्याचे ठरले. प्राचार्य डॉ. नयना तुळसकर हे सुविद्य, सुसंस्कृत नाव म्हणून निश्चित करण्यात आले. त्या स्वतःच्याच संस्थेत हिंगणघाट येथे प्राचार्य आहेत. सिंदी व पुलगाव येथे फारशी चूरस नसल्याने तिथे उमेदवार पूर्वीच निश्चित झाले होते. यावेळी भाजपने प्रथमच ब्राम्हण समाजास उमेदवारी दिली आहे. भाजपचा कट्टर पाठीराखा समाज असे म्हटल्या जाणाऱ्या तेली समाजाचे चार उमेदवार भाजपने नगराध्यक्ष पदासाठी दिले आहेत. महाराष्ट्र तैलिक महासंघाचे अध्यक्ष असलेल्या रामदास तडस यांनी पालिका निवडणुकीत समाजास न्याय मिळवून देण्याचा शब्द अखेर खरा केला.