लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यघटनेने दिलेले न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधूता हे चार मूल्य केंद्रातील भाजप सरकार ध्वस्त करीत असून मनुस्मृतीवर आधारित हिंदूराष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे, अशी टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक व विचारवंत प्रा. श्याम मानव यांनी केली.

दक्षिणायनतर्फे ‘हिंदूराष्ट्र बनाम, भारतीय संविधान’ या विषयावर प्रा. मानव यांचे व्याख्यान कवी सुरेश भट सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लिलाताई चितळे तर व्यासापीठावर प्रा. शरद पाटील, प्रा. प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने, हरीश देशमुख उपस्थित होते.

आणखी वाचा-हिवाळ्यात चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ; प्रदूषित दिवस वाढले मात्र धोकादायक प्रदूषणात घट

प्रा. मानव म्हणाले, राज्यघटना अंमलात आल्यानंतर म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षानंतर भारतात माणसाला माणूस म्हणून मान्यता मिळाली. राज्यघटनेच्या पायाभरणीला स्वातंत्र्य लढ्यापासून सुरुवात झाली होती. पुढे ही जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली. राज्यघटनेने दिलेले अधिकार, आरक्षण यामुळे शुद्र, अतिशुद्र समाज ताठ मानने उभा राहू लागला. पण, मोदी सरकारने १०१४ पासून हे चक्र उलटे फिरवायला सुरुवात केली आहे. त्यांनी भारताची हिंदूराष्ट्र स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. हिंदूराष्ट्र ही संकल्पना ब्राह्मणांना श्रेष्ठत्व देणाऱ्या मनुस्मृतीवर आधारित आहे. परंतु, सर्वांना समान मानणारी राज्यघटना संपल्याशिवाय हिंदूराष्ट्र होऊ शकत नाही. म्हणून आता राज्यघटनेची मूल्ये ध्वस्त केली जात आहेत.

शासकीय नोकऱ्या समाप्त करून संधीची समानता घालवली जात आहे. न्यायपालिकेला धमकावून हवे तसे निकाल लावून घेतले जात आहेत. काही मूठभर लोकांच्या हातात देशाची संपत्ती देऊन आर्थिक असमानता निर्माण केली आहे. निर्भयपणे बोलण्याचा अधिकार देखील हिसकावून घेतला जात आहे. सरकार विरोधात बोलल्यास तपास यंत्रणांकडून किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून धमकावले जाते, कारवाई केली जाते. ही स्थिती बदलण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर २०२४ मध्ये करावा, असे आवाहनही मानव यांनी केले. आभार तिर्थानंद पटोले यांनी मानले.

आणखी वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरांगे पाटलांना फोन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींची वागणूक सम्राटासारखी

मोदी सरकारने पुरोहितांना बोलावून नवीन संसद भवनात सेंगोल स्थापित केले. एखाद्या सम्राटाच्या राज्याभिषेकासारखा हा कार्यक्रम घेण्यात आला. हेच तर हिंदूराष्ट्राचे संकेत आहेत. हे सर्व करीत असताना देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होण्यासाठी केंद्र सरकारने सेंगोल बद्दल चुकीची माहिती पसरवली. सेंगोल विमानाने आले नव्हते आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या स्वाधीन करण्यात आले नव्हते. नेहरू यांना ते भेट म्हणून देण्यात आले होते, असेही प्रा. मानव म्हणाले.