नागपूर : बिबट्याचा बछडा फार लहान नव्हता, पण फार मोठाही नव्हता. आईशिवाय न राहू शकण्याइतका तो नक्कीच लहान होता. पण मोठेपणाचा आव आणण्यासाठी तो अस्वलाच्या मागे गेला आणि थेट विहिरीत पडला. वनखात्याचा बचाव पथकाने त्याची सुटकाच केली नाही तर त्याला झालेली जखम बरी करून त्याला त्याच्या आईजवळ नेऊन पोहचवले. नागपूर येथील वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरने वन्यजीव संरक्षण व संवर्धनात आणखी एक मनाचा तुरा रोवला.

बोर व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील कवडस वनपरिक्षेत्रातील देवळी पेंढरी शिवारात शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याचे अवघ्या ४८ तासाच्या आत आईसोबत पुनर्मिलन घडवून आणण्यात आले. शेतातील विहिरीत बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांनी प्रादेशिक वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राला दिली. केंद्राच्या बचाव पथकाने त्वरीत घटनास्थळी पोहचून पिंजरा विहीरीत सोडून बछड्याला बाहेर काढले. त्याच्या चेहऱ्यावर खरचटल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे त्याला ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे, सिद्धांत मोरे, प्रवीण मानकर यांनी प्रथमोपचार केले. त्याच दिवशी संपूर्ण परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. त्यात बछड्याची आई मादी बिबट विहिरीजवळ बछड्याला शोधण्यासाठी आलेली कॅमेरात कैद झाली. उपचारानंतर बछड्याला आईसोबत पूनर्मिलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक यश काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश भडांगे यांच्या मार्गदर्शनात तसेच राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांच्या नेतृत्त्वात बछड्याला घेऊन ट्रान्झिटची चमू घटनास्थळी पोहोचली. सर्व परिसराची परत एकदा पाहणी करून बछड्याला पिंजाऱ्यात ठेऊन सगळीकडे कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. पिंजऱ्याच्या दाराची दोरी घेऊन सगळे वाहनात बसले. त्यानंतर १० ते १५ मिनिटात मादी बिबट बछड्याला घेऊन जाण्याकरिता पिंजऱ्याजवळ आली. वाहनातूनच दोरीच्या साहाय्याने पिंजऱ्याचे दार उघडले आणि लगेच मादी बिबट पाठोपाठ तो बछडा देखील निघून गेला.

या सर्व कारवाईत केंद्राच्या चमुने प्रचंड मेहनत घेतली. यात ट्रांझिट ट्रीटमेंट केंद्राचे वनरक्षक प्रतीक घाटे, सिद्धांत मोरे, बंडू मंगर, स्वप्नील भुरे, तसेच कवडस वनपरिक्षेत्राचे वनपाल सुनील भुरे, संजय भेंडे, वनरक्षक स्वप्नील सोनवाने, प्रवीण बागडे, सुदर्शन ठोंबरे, नरेंद्र धाबर्डे, पूनम खंडाते, कीर्ती इवनाते, मीनाक्षी राठोड, अप्सरा निहारे यांचे योगदान होते.