शिक्षिका असलेल्या प्रेयसीने प्रियकराला व्हॉट्सअ’पवर ब्लॉक केले. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या शाळेमध्ये जाऊन मारहाण करून तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी शिक्षिकेच्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पवन वाडीभस्मे (२९,नेरी, कामठी) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा >>>मुंबई विमानतळावर विमान उतरण्याआधीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, प्रवासी पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन वाडीभस्मे हा उच्चशिक्षित असून शेती कसतो. त्याची विवाहित बहिण नागपुरातील पारडीत राहत होती. त्यामुळे बहिणीकडे त्याचे नेहमी येणे-जाणे होते. बहिणीच्या शेजारी पीडित २१ वर्षीय तरुणी स्विटी (काल्पनिक नाव) ही राहत होती. ती एका शाळेत शिक्षिका असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. पवनच्या बहिणीच्या घरी आलेल्या स्विटीसोबत ओळख झाली. पवनने तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तिच्याशी चँटिंग करायला लागला. मैत्रिणीचा भाऊ असल्यामुळे स्विटीसुद्धा त्याच्याशी चँटिंग करीत होती. त्यानंतर तो बहिणीच्या घरी येण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जायला लागला. त्याने ओळखी वाढविली आणि तिच्याशी फोनवरून बोलायला लागला. त्याने स्विटीला प्रेमाची मागणी केली. स्विटीनेही त्याला आई-वडिलांशी चर्चा करून कळवितो, असे आश्वासन दिले. तेव्हापासून तो स्विटीला भेटायला तिच्या शाळेसमोर यायला लागला. शाळा सुटल्यावर चहा-नाश्ता करण्यासाठी नेत होता. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्या आईवडिलांशी चर्चा करीत लग्नाची बोलणी केली. तिच्या आईवडिलांना मुलीला निर्णय घेण्यास सांगितला. स्विटीने पवनला होकार दिला. तेव्हापासून तो तिला नेहमी लग्नासाठी तगादा लावयला लागला.
हेही वाचा >>>उच्च पदस्थांकडून न्यायधीशांच्या नियुक्तींवर तोंडसूख, ॲड. फिरदोस मिर्झा यांचे प्रतिपादन
तिला अनेकदा त्याने फिरायला नेले तसेच तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यानंतर तो तिच्या शाळेसमोर येऊन वारंवार भेटायला किंवा फिरायला जाण्यासाठी हट्ट करायला लागला. तो एकदा दारू पिऊन शाळेत आला आणि त्याने बळजबरीने तिला गाडीवर बसवून फिरायला नेले. शाळेत गोंधळ आणि बदनामी नको म्हणून स्विटीसुद्धा गेली. दारुची सवय असल्याची माहिती झाल्यामुळे तिने पवनला लग्नास नकार दिला. तसेच त्याचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केला. त्यामुळे पवन चिडला. तो तिचा रोज पाठलाग करून शाळेत जायला लागला. २६ जानेवारीला शाळेतील कार्यक्रम संपल्यानंतर पवनने स्विटीला सोबत फिरायला जाण्यासाठी गळ घातली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे दारु पिऊन असलेल्या पवनने तिला अश्लील शिविगाळ केली आणि मारहाणा केली. तसेच तिच्याशी अश्लील चाळे केले. अपमानित झालेल्या स्विटीने थेट पारडी पोलीस स्टेशन गाठले. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.