बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावात सोमवारी रात्री वरुण राजा कोपला. जिल्ह्यातील तब्बल ११ महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा महसूल मंडळात पावणे दोनशे मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी संध्याकाळी जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता संपलेल्या गत २४ तासात जिल्ह्यात एकूण ४४३ मिमी पावसाची नोंद झाली. मलकापूर मंडळात १२३.५ मिमी, नरवेल मंडळात ७९, धरणगाव मंडळात ७९.३ मिमी पाऊस झाला. सिंदखेड राजा तालुक्यातील सिंदखेड राजा मंडळात १५२ मिमी, दुसरबीड मंडळात ६५.५ मिमी, किनगाव राजा मध्ये ६९.८ मिमी, देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर मंडळात १५२ मिमी, अंढेरा मंडळात ६९ मिमी, चिखली तालुक्यातील पेठ मंडळात ६९ मिमी तर मोताळा तालुक्यातील शेलापूर मंडळात ६५. ८ मिमी पावसाची नोंद झाली.
चिखली पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा ईशारा
चिखली परिसरातील गोद्री पाझर तलावाचे पाणी जांबुवती नदी पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे जांबुवती नदीला पूर येण्याची दाट शक्यता असल्याने चिखली शहरातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. गोदरी पाझर तलाव पूर्ण भरला असून त्याचे पाणी जांबवंती नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, चिखली शहरातील नदीकाठच्या परिसरात पाणी शिरण्याचा धोका कायम आहे .
काही दिवसापूर्वी जांबुवती नदीला आलेल्या पुरामुळे चिखली शहरातील नदी काठावरील आणि सखल भागातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले होते. तसेंच अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.