बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या असून नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी ११अध्यक्ष व २८६ सदस्य पदासाठी खोऱ्याने अर्ज प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस व मित्र पक्षांनी आपल्या अध्यक्षीय उमेदवाराची नावे गुलदस्त्यात ठेवली होती. मात्र आज सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी काँग्रेस व मित्र पक्षांच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवाराची नावे जाहीर झाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्षाच्या नगर परिषद अध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आज अंतिम दिवशी अर्ज दाखल केले आहे. बुलढाणा मध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे लक्ष्मी दत्ता काकस यांना उमेदवारी दिली आहे. चिखली मध्येही काँग्रेस ने अखेर बोन्द्रे परिवारातीलच काशिनाथ आप्पा बोंद्रे यांना संधी दिली.मेहकर मध्ये काँग्रेस ने माजी नगराध्यक्ष कासम पिरू गवळी यांना संधी दिली. विलास चनखोरे यांची संधी हूकली. काँग्रेस ने लोणार मध्ये मिरा भुषण मापारी, मलकापूर मध्ये
अतिकउर रहमान जवाहरी, जळगाव जामोद मध्ये काँग्रेस गजानन सुर्यवंशी, शेगाव मध्ये प्रकाश एकनाथ शेगोकार, खामगाव पालिकेत स्मिता किशोर भोसले यांना उमेदवारी दिली. सिंदखेड राजा मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सौरभ विजय तायडे तर देउळगाव राजा मध्ये शहर विकास आघाडीच्या नेहा बलवंत सुंगट यांना उमेदवारी दिली आहे. नांदुरा पालिकेत मलकापूरचे माजी आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात नगर विकास आघाडी भाजपा विरुद्ध लढत आहे. आघाडीच्या वतीने संतोषी महेश चांडक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न
काँग्रेस व मित्र पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले आहे. यामुळे बंडखोरीचा धोका टाळण्यात आघाडी प्रामुख्याने काँग्रेस बव्हंशी यशस्वी झाली आहे. मात्र प्रत्यक्ष लढतीत छुपी बंडखोरी उमेदवारसाठी त्रास दायक ठरू शकते.
नगराध्यक्षपदासाठी वंचिततर्फे संगीता हिरोळेंचा अर्ज, काँग्रेसची डोकेदुखी वाढली
बुलढाणा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने डॉ. संगीता अर्चित हिरोळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.
यंदा काँग्रेससोबत आघाडी कडून नगराध्यक्ष पदाचा हट्ट वंचितने धरला आहे बुलढाण्याचे व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल हिरोळे यांची सुन डॉ. संगीता अर्चित हिरोळे वंचितच्या उमेदवार आहेत.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि वंचितचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा केली. परंतू वंचितच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अमोल हिरोळे यांना प्रमुख पदाधिकार्यांनी निवडणूक लढण्यासाठी गळ घातल्याचे समजते. या राजकीय घडामोडीत अॅड. प्रकाश आंबेडकर हे या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत आग्रही राहतात का याकडे महा विकास आघाडी व राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
